इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग! ५० जणांचा होरपळून मृत्यू, तीन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Iraq Fire Break Out : इराकच्या अल-कुट शहरातील शॉपिंग मॉलमध्ये गुरुवारी (१७ जुलै २०२५) सायंकाळी एक भीषण आग लागून संपूर्ण देश हादरला. या आगीत सुमारे ५० नागरिकांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला असून, शेकडो जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पाच मजली इमारत पूर्णतः आगीच्या विळख्यात अडकलेली दिसते. धुराचे लोट आणि अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न यामुळे हे दृश्य अंगावर शहारे आणणारे आहे.
स्थानिक प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना वासित प्रांतातील अल-कुट शहरातील एका सुपरमार्केट आणि रेस्टॉरंटमध्ये घडली. त्या वेळेस अनेक नागरिक खरेदी करत होते तसेच काही लोक जेवण घेत होते. अचानकपणे लागलेल्या या आगीने संपूर्ण इमारतीला कवेत घेतले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. अनेक नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले असले तरी काही जण आत अडकून पडले आणि दुर्दैवाने त्यांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला.
इराकच्या अधिकृत आयएनए (INA) वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, वासित प्रांताचे गव्हर्नर मोहम्मद अल-मायाही यांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. गव्हर्नर म्हणाले, “या आगीत सुमारे ५० नागरिकांचा मृत्यू झाला असून, इतर काहींची प्रकृती गंभीर आहे. आगीचे मूळ कारण अद्याप समोर आलेले नसले तरी प्राथमिक तपास सुरू आहे. ४८ तासांच्या आत प्राथमिक निष्कर्ष जाहीर करण्यात येणार आहेत.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 8 वर्षांची तपश्चर्या! रशियाची ‘ती’ रहस्यमय साध्वी, गोकर्ण जंगलात गुहा, गुहेत रुद्र मूर्ती; वाचा ‘ही’ गूढ रंजक कहाणी
गव्हर्नर अल-मायाही यांनी ज्या मॉलमध्ये आग लागली त्याच्या मालकांविरोधात अधिकृत खटला दाखल केला असून, निष्काळजीपणा, सुरक्षा यंत्रणांची कमतरता आणि योग्य व्यवस्थापन नसणे याला जबाबदार धरले जात आहे. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासन कठोर पावले उचलणार आहे. घटनेनंतर संपूर्ण इराकमध्ये तीन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, शासकीय इमारतींवर काळे झेंडे लावण्यात आले आहेत. या घटनेनंतर देशभरात शोककळा पसरली आहे.
🔴#LATEST — Fire at shopping mall in eastern Iraq kills 50, Iraqi sources report pic.twitter.com/v6ftD4YMdi
— Türkiye Today (@turkiyetodaycom) July 17, 2025
credit : social media
ही दुर्घटना समजताच, अनेक देशांनी इराक सरकारला सहवेदना व्यक्त केल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांनीही या घटनेचा तीव्र निषेध करत इराकच्या जनतेप्रती सहवेदना व्यक्त केली आहे.
या दुर्घटनेनंतर इराकमधील सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था आणि आग प्रतिबंधक उपाययोजना यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मॉल व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त करत आहेत.
या आगीत जिवंत होरपळलेल्या नागरिकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. अनेक नागरिकांनी मॉलच्या व्यवस्थापनाला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ना मुस्लिम ना ख्रिश्चन, मग कोण आहेत ड्रुझ? 8 लाख लोकसंख्या असलेला ‘गुप्त’ धर्म, ज्यासाठी इस्रायलने चढवला सीरियावर हल्ला
शेवटी…
या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण इराक हळहळला आहे. मृतांच्या नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे. सरकारने तपास जलदगतीने पार पाडून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी आता देशभरात सजगता आणि कठोर उपाययोजना अपेक्षित आहेत.