पहिली घटना भाईंदर पश्चिमेतील लोधा कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील इंद्रलोक फेस-4 परिसरात घडली. येथे मोकळ्या जागेत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या झोपडपट्टीला अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण झोपडपट्टीला वेढा घातला. आग इतकी भीषण होती की, झोपड्यांमध्ये ठेवण्यात आलेल्या घरगुती गॅस सिलेंडरचे एकामागोमाग स्फोट होऊ लागल्याने परिसर दणाणून गेला. या स्फोटांमुळे नागरिकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून जवानांकडून युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न केले.
पहिल्या घटनेची धामधूम सुरू असतानाच दुसरी आग लागल्याची घटना काशिमीरा येथील दर्गा रोडवरील मशिदीजवळ घडली. अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले.
विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून मीरा-भाईंदर शहरात सातत्याने आगीच्या घटना घडत असून शहरातील नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. कधी अनधिकृत झोपडपट्ट्या, तर कधी अनधिकृत फर्निचर गाळे, गोदामे आणि व्यावसायिक आस्थापनांमधून अशा दुर्घटना घडत असल्याने शहराच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, “शहरात अनधिकृत बांधकामं आणि धोकादायक व्यवसायांवर कारवाई होत नसल्यानेच अशा घटना वारंवार घडत आहेत. प्रशासनाने वेळेत उपाययोजना केल्या नाहीत तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असा इशारा दिला आहे. दरम्यान, दोन्ही घटनांमध्ये नेमके किती नुकसान झाले आणि जीवितहानी झाली आहे का, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसून पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून तपास सुरू आहे.






