Su‑35 weak radar : रशियाच्या प्रसिद्ध सुखोई SU-35 लढाऊ विमानांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. इजिप्तने 2018 मध्ये केलेला 24 SU-35 विमाने खरेदी करण्याचा करार रद्द केल्यानंतर, आता या विमानातील गंभीर तांत्रिक दोष समोर आले आहेत. विशेष म्हणजे, रशिया हीच विमाने भारतासारख्या महत्त्वाच्या देशांना विकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे भारताने ही विमाने का नाकारली यामागचे रहस्य उघड झाले आहे.
इजिप्तने SU-35 करार रद्द का केला?
इजिप्तच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, SU-35 विमानांमध्ये गंभीर तांत्रिक त्रुटी आढळून आल्या. विमानाचे Irbis-E रडार हे PESA (Passive Electronically Scanned Array) तंत्रज्ञानावर आधारित असून, ते आधुनिक AESA (Active Electronically Scanned Array) रडारच्या तुलनेत खूपच मागासलेले मानले जाते. आजच्या युगात राफेल आणि F-35 सारख्या विमानांमध्ये AESA रडार वापरले जात असून, ते अधिक अचूक, विश्वासार्ह आणि इलेक्ट्रॉनिक जामिंगविरोधात सक्षम असतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 5 जुलैची भविष्यवाणी खरी ठरणार?? दोन आठवड्यांत 1000हून अधिक भूकंप, जपानच्या टोकारा बेटांवर भीतीचं सावट
इंजिन आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमतेवरही प्रश्न
SU-35 मध्ये वापरण्यात आलेले AL-41F1S इंजिन उच्च शक्ती निर्माण करत असले तरी ते अत्याधिक उष्णता आणि आवाज निर्माण करते. त्यामुळे शत्रूच्या रडार किंवा इन्फ्रारेड सिस्टमना हे विमान सहजपणे सापडू शकते. यामुळे त्याची ‘स्टेल्थ’ (गुप्तता) क्षमता कमी होते. तसेच या विमानाची इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीही (Electronic Warfare System) अत्याधुनिक युद्धप्रणालींच्या तुलनेत फारच दुर्बल असल्याचे इजिप्तच्या लष्करी विश्लेषकांनी स्पष्ट केले आहे.
अमेरिकेच्या दबावाचीही भूमिका
इजिप्तने SU-35 चा करार रद्द करण्यामागे केवळ तांत्रिक कारणच नव्हते, तर अमेरिकेच्या CAATSA कायद्याअंतर्गत निर्बंधांची धमकी हीदेखील एक महत्त्वाची बाब ठरली. जर इजिप्तने रशियाकडून लढाऊ विमाने घेतली असती, तर दरवर्षी अमेरिकेकडून मिळणारी 1 अब्ज डॉलरपेक्षा अधिक लष्करी मदत धोक्यात आली असती. परिणामी, इजिप्तने करार रद्द करत रशियाला मोठा झटका दिला.
भारताकडे SU-35 विकण्याचा रशियाचा प्रयत्न
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताला SU-57 आणि SU-35 विकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, भारताकडून याबाबत अद्याप कोणताही उत्साह दाखवलेला नाही. भारतीय हवाई दलाने फ्रेंच राफेल लढाऊ विमानांची निवड करत रशियन प्लॅटफॉर्मवर अवलंबून न राहण्याचा संकेत दिला आहे. राफेलमध्ये वापरण्यात आलेले RBE2 AESA रडार आणि SPECTRA इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली या बाबतीत SU-35 पेक्षा अनेक पटींनी प्रगत आहेत.
रशियाच्या शस्त्रास्त्र उद्योगाची पडझड?
युक्रेन युद्धानंतर रशियाने आपल्या SU-35 ताफ्याचा जवळपास 40% भाग गमावल्याचे अहवाल सांगतात. रशियाने SU-35 विमाने इराणकडे वळवण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्या डिलिव्हरीतही विलंब होत आहे. त्यामुळे जागतिक शस्त्रास्त्र बाजारपेठेत रशियाच्या विश्वासार्हतेवर मोठा परिणाम झाला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भूकंपाचे 13 धक्के, 10 स्फोट… रशियाने युक्रेनची राजधानी कीववर अचानक डागले विनाशकारी क्षेपणास्त्र
इजिप्तच्या SU-35 करार
इजिप्तच्या SU-35 करार रद्दीकरणाच्या पार्श्वभूमीवर आता रशियन लढाऊ विमानांच्या गुणवत्ता आणि विश्वासार्हतेवर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. भारतासारखा देश जो उच्च दर्जाच्या लढाऊ विमानांच्या शोधात आहे, त्याने SU-35 पासून अंतर ठेवणे अधिक शहाणपणाचे ठरेल, असे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. पुतिन भारताला जी विमाने विकू इच्छितात, ती ‘रद्दी’ असल्याचा आरोप आता जोर धरत आहे – आणि हा आरोप केवळ राजकीय नाही, तर तांत्रिक कारणांवर आधारित आहे.