Saudi-Iran talks : हुथी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सौदी-इराण चर्चा; तेहरानने तणाव कमी करण्यासाठी दिला 'असा' प्रस्ताव ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
पश्चिम आशियातील (मध्य पूर्व) राजकीय आणि सुरक्षेचे वातावरण अत्यंत नाजूक टप्प्यावर पोहोचले आहे. येमेनच्या हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या (Saudi-Iran Talks) अत्यंत महत्त्वपूर्ण आणि गजबजलेल्या ठिकाणांना लक्ष्य करत क्षेपणास्त्र हल्ल्यांची मालिका सुरू केली आहे. सौदीची राजधानी असलेल्या रियाध येथील ‘किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ’ (King Khalid International Airport) आणि दम्माम येथील ‘किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळ’ यांवर झालेल्या भीषण हल्ल्यांमुळे संपूर्ण प्रदेशात युद्धाचा भडका उडण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर सौदी अरेबिया आणि इराण यांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली आहे.
सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यात दूरध्वनीवरून संवाद झाला. हुथी बंडखोरांनी सौदीच्या नागरी ठिकाणांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या तीव्रतेनंतर दोन्ही देशांमधील ही पहिलीच अधिकृत आणि सार्वजनिक चर्चेची नोंद आहे. या चर्चेदरम्यान इराणने सौदी अरेबिया आणि येमेन यांच्यातील दीर्घकालीन संघर्ष संपवण्यासाठी आणि शांतता चर्चा सुलभ करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा प्रस्ताव दिला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी टेलिग्रामद्वारे ही माहिती देत स्पष्ट केले की, तेहरान प्रदेशातील तणाव कमी करण्यासाठी (De-escalation) कटिबद्ध आहे.
शनिवारी रियाधच्या किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या भीषण क्षेपणास्त्र हल्ल्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. या हल्ल्यात सुरुवातीला १२ जणांचा मृत्यू झाला होता आणि ३०९ हून अधिक नागरिक जखमी झाले होते. मात्र, रविवारी उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या एका भारतीय नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पहिल्या हल्ल्यातील मृतांची संख्या १३ वर पोहोचली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Emergency: पाकिस्तानमध्ये तणाव वाढला, खैबर पख्तुनख्वामध्ये आणीबाणी अन् लष्कर तैनात; कराचीमध्ये कलम 144 लागू
ही शोकांतिका इथेच थांबली नाही. रविवारी पुन्हा एकदा किंग खालिद विमानतळाच्या टर्मिनल ४ वर हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्र डागले. या क्षेपणास्त्रामुळे विमानतळ परिसरात भीषण आग लागली. सौदी नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने (GACA) दिलेल्या माहितीनुसार, या दुसऱ्या हल्ल्यात एका पाकिस्तानी नागरिकाचा जागीच मृत्यू झाला असून ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय, अद्याप पूर्ण तपशील समोर आला नसला तरी, बहरीन आणि कतारच्या सीमेवळ असलेल्या दम्माम शहरातील किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळावरही क्षेपणास्त्र हल्ला झाल्याची पुष्टी सौदी अधिकाऱ्यांनी केली आहे. गेल्या एका दशकातील सौदी अरेबियाच्या भूमीवरील हा सर्वात प्राणघातक हल्ला मानला जात आहे.
नागरिक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांसारख्या संवेदनशील नागरी ठिकाणांवर झालेल्या या हल्ल्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र पडसाद उमटले आहेत. सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी बहरीन, ब्रिटन, जॉर्डन आणि युरोपियन युनियनच्या प्रतिनिधींशी तातडीने चर्चा केली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Riyadh Airport: कुणी विश्रांती घेत होते तर कुणी वाट पाहत होते, क्षणात बदलले चित्र; रियाध विमानतळावरील हल्ल्याचा VIDEO VIRAL
हौथी बंडखोरांच्या या अचानक वाढलेल्या आक्रमकतेमुळे केवळ सौदी अरेबियाच नव्हे, तर संपूर्ण आखाती देशांच्या आर्थिक स्थैर्याला मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द करावी लागल्यामुळे आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने जागतिक व्यापार आणि इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सौदी अरेबिया सध्या या तणावातून मार्ग काढण्यासाठी आणि युद्ध पसरण्यापासून रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय मित्रराष्ट्रांसोबत मुत्सद्दी मार्गाने (Diplomacy) काम करत आहे. इराणने दिलेला चर्चेचा प्रस्ताव हा या संकटावर राजकीय तोडगा काढण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो, मात्र हुथी बंडखोर याला काय प्रतिसाद देतात यावर पुढील घडामोडी अवलंबून असतील.






