सौदी अरेबियाने वर्क व्हिसाच्या नियमांमध्ये केला 'असा' बदल; याचा परिणाम होणार भारतीय कामगारांवर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Saudi Arabia new work visa rules 2026 : खाडी देशांमध्ये (Gulf Countries) नोकरी करून आपले भविष्य उज्ज्वल करू पाहणाऱ्या लाखो भारतीय तरुणांसाठी आणि कामगारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सौदी अरेबिया सरकारने परदेशी कामगारांच्या भरती प्रक्रियेला अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी आणि आपल्या देशातील कामगार बाजारपेठेवर नियंत्रण मिळवण्यासाठी वर्क व्हिसाच्या (Saudi Work Visa) नियमांमध्ये अत्यंत मोठे आणि महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. सौदी अरेबियाच्या मानव संसाधन आणि सामाजिक विकास मंत्रालयाच्या अधिकृत ‘किवा’ (Qiwa) प्लॅटफॉर्मने या नवीन नियमांची घोषणा केली आहे. या नवीन बदलांनुसार, सौदीमध्ये नव्याने सुरू झालेल्या कंपन्या किंवा स्टार्टअप्ससाठी तात्काळ उपलब्ध असणाऱ्या वर्क व्हिसाच्या संख्येत मोठी कपात करण्यात आली आहे.
सौदी सरकारच्या ‘किवा’ प्लॅटफॉर्मने स्पष्ट केले आहे की, ज्या कंपन्यांना किंवा व्यावसायिक संस्थांना सुरू होऊन दोन वर्षांपेक्षा कमी काळ झाला आहे, अशा कंपन्या आता एकावेळी जास्तीत जास्त फक्त ५ इन्स्टंट (तात्काळ) व्हिसा मिळवण्यासाठी पात्र असतील. याउलट, ज्या कंपन्या दोन वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत आणि ज्यांनी बाजारात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे, त्यांच्यासाठी ही मर्यादा ५० व्हिसांपर्यंत ठेवण्यात आली आहे. जुन्या कंपन्यांनी एकाच वेळी अर्ज केला किंवा एका आठवड्यात अनेक वेळा वेगवेगळे अर्ज केले, तरीही त्यांना ५० व्हिसाची मर्यादा लागू राहील. या निर्णयामुळे नवीन कंपन्यांच्या अनिबंध भरती प्रक्रियेला चाप बसणार आहे.
नवीन नियमावलीनुसार, सौदी अरेबियामध्ये सुरू होणाऱ्या नव्या व्यवसाय स्थापना कार्यक्रमात (Establishment Program) सहभागी होणाऱ्या आणि सर्व आवश्यक निकष पूर्ण करणाऱ्या कंपन्यांना सुरुवातीच्या टप्प्यात फक्त दोनच व्हिसा जारी केले जातील. या कंपन्यांनी त्यांच्या व्यवसायात ‘सौदीकरण’ (Saudization) म्हणजेच स्थानिक सौदी नागरिकांना नोकरी देण्याचे प्रमाण वाढवले, तरच त्यांना भविष्यात अधिक व्हिसा मिळवण्याची परवानगी दिली जाईल. सौदी तरुणांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देणे, हाच यामागील मुख्य उद्देश आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : G7Summit : Modi-Trump यांच्यात कमालीचा तणाव; हस्तांदोलन झाले, पण ‘ती’ प्रसिद्ध मिठी का टाळली? पाहा तज्ज्ञांचे मत
यासोबतच, ‘किवा’ प्लॅटफॉर्मने परदेशातून म्हणजेच बिगर-सौदी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी १० अत्यंत कडक अटी निश्चित केल्या आहेत. यामध्ये संबंधित व्यवसायाचा दर्जा सरकारी रेकॉर्डवर “सक्रिय” (Active) असणे अनिवार्य आहे. तसेच नोकरीवर येणाऱ्या कर्मचाऱ्याकडे वैध वर्क परमिट आणि वैध व्यावसायिक नोंदणी असणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाची अट म्हणजे, त्या कंपनीने सौदी सरकारच्या नितकात (Nitaqat) प्रणालीनुसार “मीडियम ग्रीन” (Medium Green) किंवा त्याहून वरच्या श्रेणीत राहून सौदीकरणाच्या आवश्यकता पूर्ण केलेल्या असाव्यात.
सौदी सरकारने परदेशी कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी ‘वेतन संरक्षण प्रणाली’ (Wage Protection System) लागू केली आहे, तिचे पालन करणे कंपन्यांना बंधनकारक असेल. तसेच कंपन्यांनी ‘अबशेर’ (Absher) किंवा ‘मुकीम’ (Muqeem) सारख्या अधिकृत सरकारी डिजिटल प्लॅटफॉर्मवर पुरेशी आर्थिक शिल्लक राखणे देखील गरजेचे आहे.
Saudi Arabia to require Premium Residency holders to obtain dedicated work permits https://t.co/fmgIfhri90 — Economic Times (@EconomicTimes) June 16, 2026
credit – social media and Twitter
इतर अटींमध्ये, ज्या कंपन्यांमध्ये १० किंवा त्याहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांनी वार्षिक स्वयं-मूल्यांकन (Annual Self-Evaluation) प्रक्रियेचे पूर्ण पालन करणे आवश्यक आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यस्थळाची अधिकृत नोंदणी ‘किवा’ प्लॅटफॉर्मवर करणे गरजेचे असून, सौदीत कामासाठी येणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्याचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. या सर्व अटी पूर्ण केल्यानंतरच कंपन्यांना त्यांच्या कोट्यानुसार परदेशी नागरिकांना व्हिसा देता येईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Modi Paris: पंतप्रधान मोदींचे अनिवासी भारतीयांनी केले स्वागत; राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत विवाटेक 2026 मध्ये होणार सहभाग
सौदी अरेबियाच्या या नव्या धोरणामुळे भारतीय कामगार वर्गाला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. सौदी अरेबियातील एकूण परदेशी कामगारांमध्ये भारतीय नागरिकांचा वाटा खूप मोठा आहे. बांधकाम क्षेत्रापासून ते आयटी (IT) आणि व्यवस्थापन क्षेत्रापर्यंत लाखो भारतीय तिथे कार्यरत आहेत. आता नवीन कंपन्यांसाठी तात्काळ व्हिसा देण्याची संख्या फक्त ५ वर आणल्यामुळे, सौदीमधील नवीन कंपन्या किंवा स्टार्टअप्समध्ये नोकरी शोधणाऱ्या भारतीय व्यावसायिकांची भरती प्रक्रिया कमालीची मंदावणार आहे.
या नवीन सिस्टीममुळे आता नोकरीसाठी सौदीत जाऊ इच्छिणारे भारतीय तरुण नवीन कंपन्यांपेक्षा प्रस्थापित आणि जुन्या कंपन्यांना (ज्यांना २ वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे) अधिक प्राधान्य देतील. कारण जुन्या कंपन्यांकडे ५० व्हिसांपर्यंतचा मोठा कोटा उपलब्ध असल्यामुळे तिथे व्हिसा मिळण्याची आणि नोकरी सुरक्षित राहण्याची शक्यता जास्त असेल. परिणामी, सौदीत नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या भारतीय उद्योजकांनाही आता स्थानिक सौदी कर्मचाऱ्यांवर अधिक अवलंबून राहावे लागेल.






