US Shooting : अमेरिकेत पुन्हा गोळीबार; ब्राउन विद्यापीठात झालेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू तर 8 जखमी
वॉशिंग्टन : अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली. रोड आयलंडमधील ब्राउन विद्यापीठात झालेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला असून, आठ जण जखमी झाले आहेत. रविवारी ब्राउन विद्यापीठ परिसरात अनेक जणांवर गोळीबार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये सध्या दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असले तरी पोलिसांनी यावर अद्याप कोणतेही अधिकृत भाष्य केले नाही.
ब्राउन विद्यापीठाच्या आपत्कालीन सूचना प्रणालीद्वारे जारी केलेल्या अलर्टनुसार, विद्यापीठ अधिकाऱ्यांनी सुरुवातीला विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना एक संशयित ताब्यात असल्याची माहिती दिली. मात्र, नंतर पोलिस अजूनही संशयितांचा शोध घेत आहेत, असे सांगितले. विद्यापीठाच्या अभियांत्रिकी आणि भौतिकशास्त्र विभागाचे सात मजली संकुल असलेल्या बार्स आणि हॉली बिल्डिंग्जजवळ ही गोळीबाराची घटना घडली. विद्यापीठाच्या वेबसाइटनुसार, या इमारतीत १०० हून अधिक प्रयोगशाळा, डझनभर खोल्या आणि कार्यालये आहेत. गोळीबाराच्या वेळी अभियांत्रिकी डिझाइन परीक्षा सुरू होती. या अचानक झालेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली.
दरम्यान, विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना सांगितले की, एक संशयित ताब्यात आहे, परंतु, नंतर त्यांनी अशा वृत्ताला दुजोरा न देता पोलिस अजूनही संशयितांचा शोध घेत आहेत, असे म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली. परीक्षा सुरु असताना अचानक गोळीबार झाल्यामुळे याचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना घटनेची माहिती
अमेरिकेत अशाप्रकारे गोळीबाराची घटना घडल्याने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तातडीने याची माहिती देण्यात आली. ट्रम्प यांनी यावर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला असून, या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले आहेत.
यापूर्वीही झाला होता गोळीबार
अमेरिकेतील व्हाईट हाऊसजवळ गोळीबाराची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. यात दोन नॅशनल गार्ड सैनिकांचा मृत्यू झाला. वेस्ट व्हर्जिनियाचे गव्हर्नर पॅट्रिक मॉरीसी यांनी गोळीबाराच्या या घटनेत दोन सैनिकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यामध्ये पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास केला गेला.
हेदेखील वाचा : अमेरिकेतील व्हाईट हाऊसजवळ गोळीबार; दोन सुरक्षारक्षकांचा मृत्यू, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले…






