युद्धांमुळे अमेरिकेचा शस्त्रास्त्र साठा घटला (Photo Credit- AI)
माहितीनुसार, पेंटागनच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांनी जनरल मोटर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मॅरी बारा आणि फोर्ड मोटर्सचे जिम फार्ले यांच्यासह अनेक मोठ्या औद्योगिक कंपन्यांच्या प्रमुखांशी प्राथमिक चर्चा केली आहे. या चर्चेचा मुख्य उद्देश कारखान्यांची क्षमता वापरून शस्त्रास्त्रांचे उत्पादन वेगाने वाढवणे हा आहे. या कंपन्या आधीपासूनच अमेरिकन संरक्षण यंत्रणांना वाहने पुरवत आहेत, मात्र आता त्यांच्याकडून प्रत्यक्ष शस्त्रास्त्र निर्मितीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
युक्रेनला करण्यात आलेली मदत आणि मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे अमेरिकेच्या पारंपारिक शस्त्रास्त्र साठ्यावर मोठा ताण आला आहे. पेंटागनच्या मते, जर हे संघर्ष अधिक लांबले तर सध्याच्या संरक्षण कंपन्यांना मागणी पूर्ण करणे अशक्य होईल. त्यामुळेच, नागरी वापरासाठी वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांना ‘लष्करी रसद’ पुरवण्यासाठी तयार राहण्यास सांगितले जात आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या (WSJ) वृत्तानुसार, संरक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, लॉकहीड मार्टिन किंवा बोईंग सारख्या पारंपारिक संरक्षण कंपन्यांना पाठबळ देण्यासाठी इतर उत्पादकांची गरज आहे. या चर्चेत GE एरोस्पेस आणि मशिनरी उत्पादक ओशकोश यांसारख्या कंपन्यांचाही समावेश होता. आणीबाणीच्या प्रसंगी या कंपन्या किती वेगाने त्यांच्या उत्पादन ओळी (Production Lines) बदलू शकतात, याचा आढावा घेतला जात आहे.
पेंटागनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, संरक्षण विभाग उपलब्ध व्यावसायिक तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षमतेचा वापर करून ‘डिफेन्स इंडस्ट्रियल बेस’ विस्तारण्यासाठी कटिबद्ध आहे. संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी या प्रक्रियेला ‘वॉरटाइम लेवलिंग’ असे संबोधले आहे. म्हणजेच, युद्धाच्या काळात ज्याप्रमाणे संपूर्ण देश शस्त्रास्त्र निर्मितीसाठी सज्ज होतो, त्याच पातळीवर उद्योगांना नेण्याचे हे धोरण आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यानही अमेरिकेने कार कारखान्यांमध्ये रणगाडे आणि विमाने बनवून जर्मनी आणि जपानवर मात केली होती. आता ७० वर्षांनंतर पुन्हा एकदा तीच परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे.
चर्चेनंतर इराणी नेत्यांना ठार मारण्याचा पाकचा होता कट; विमान सोडून बस-ट्रेनने गाठले तेहरान






