Iran-US War : '...तर आम्ही चर्चा, बैठका रद्द करू'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा दिली इराणला धमकी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले आहेत. इराणवर इस्त्रायल आणि अमेरिका या दोन्ही देशांकडून जोरदार हल्ले केले जात होते. मात्र, सध्या शांतिकरार झाल्याने हल्ले कमी झाल्याचे दिसून येत आहे. असे असताना आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे. ‘जर इराणने अणुनिरीक्षणास परवानगी देण्यास नकार दिला, तर दोन्ही देशांमधील सुरू असलेली तांत्रिक चर्चा थांबवली जाईल’, असे म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, तेहरानने त्यांना वैयक्तिकरित्या निरीक्षणाचे आश्वासन दिले आहे आणि चर्चा सकारात्मक दिशेने पुढे जात आहे. इराणला अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखणे हे अमेरिकेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. अमेरिका-इराण करारानुसार तीन महिन्यांहून अधिक काळानंतर पश्चिम आशियामध्ये प्रस्थापित झालेली शांतता पुन्हा धोक्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, जर इराणने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेला (IAEA) आपल्या अणुकार्यक्रमाची तपासणी करण्यास परवानगी दिली नाही, तर ते तेहरानसोबत सुरू असलेल्या तांत्रिक चर्चेसंबंधित बैठका रद्द करतील.
इराणची तत्त्वतः आधीच सहमती
पेनसिल्व्हेनियातील लेहाय काउंटी येथील मॅक ट्रक्स प्लांटला भेट देताना पत्रकारांशी बोलताना, ट्रम्प यांनी निरीक्षणाबाबतच्या इराणच्या भूमिकेबद्दलची चिंता फेटाळून लावली. संयुक्त राष्ट्रांच्या अणुनिरीक्षण संस्थेचे निरीक्षक तैनात करण्याच्या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले की, इराणने तत्त्वतः आधीच सहमती दर्शवली आहे.
इराणसोबतची वाटाघाटी योग्य दिशेने
इराणसोबतची वाटाघाटी योग्य दिशेने पुढे जात आहे आणि पूर्वीच्या तुलनेत तेहरानची स्थिती लक्षणीयरीत्या कमकुवत झाली आहे. इराणसोबत आमचे संबंध खूप चांगले चालले आहेत. सध्या हे संबंध खूपच कमकुवत झाले आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत एका करारावर काम करत आहोत, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
इराणची लष्करी शक्ती पूर्णपणे नष्ट
ट्रम्प यांनी असाही दावा केला की, ‘इराण सामरिकदृष्ट्या कमकुवत स्थितीत पोहोचला आहे. आम्ही इराणला अशा परिस्थितीत आणले आहे, जे यापूर्वी कोणीही केलेले नाही. हे काम गेल्या ४७ वर्षांतील इतर राष्ट्राध्यक्षांनी करायला हवे होते. इराणची लष्करी क्षमता जवळजवळ नष्ट झाली आहे. त्यांचे नेतृत्व कमकुवत आहे आणि त्याची रडार प्रणाली नष्ट झाली आहे’.






