जपानमध्ये लग्नाचा नवा ट्रेंड, प्रेम आणि शारीरिक संबंधाशिवायाचे नाते ‘फ्रेंडशिप मॅरेज’!

जपानमध्ये लग्नाचा नवा ट्रेंड चर्चेत आला आहे. या लग्नात इतर जोडप्यांप्रमाणे प्रेम आणि शारीरिक संबध नसतात

    लग्न (Marriage) म्हणजे दोन जिवाचं मिलन, दोन शरीराचं मिलनं असतं. या लग्नबंधनात प्रेम, आपुलकी एकमेकांबद्दल ओढ असते. पण काळानुसार लग्न या संकल्पनेची व्याख्या बदलत जाताना सध्या दिसत आहे. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये तर दोन व्यक्ती त्यांच्या मतानुसार, लग्न न करता एकत्र राहतात. पण जपानमध्ये सध्या लग्नाची एक संकल्पना रूजत आहे , ज्याला ‘फ्रेंडशिप मॅरेज’ असं संबोधलं जात आहे. हा ट्रेंड म्हणजे लग्नाचा असा प्रकार आहे, ज्यामध्ये तरुण-तरुणी पार्टनर बनतात. पण या लग्नात ना प्रेम असतं ना यामध्ये दोघांमधील शारीरिक संबंधांना वाव असतो. जपानच्या 124 दशलक्ष लोकसंख्येपैकी एक टक्के लोक या प्रकारच्या विवाहाला प्राधान्य देत आहेत.

    ‘फ्रेंडशिप मॅरेज’ म्हणजे काय?

     ‘फ्रेंडशिप मॅरेज’ अर्थात मैत्री विवाह म्हणजे तरुण कायदेशीर पद्धतीने लग्न करतात. पण पती पत्नींप्रमाणे रोमान्स किंवा इतर जबाबदाऱ्या पार पाडत नाहीत. त्यांची इच्छा असल्यास त्यांना कृत्रिम गर्भाधानाद्वारेही मुले होऊ शकतात. या विवाहात दोन्ही जोडीदारांना दुसऱ्या जोडीदारासोबत नात्यात राहण्याचं स्वातंत्र्यही मिळतं. अशाच एका जोडप्यानं एका मुलाखतीत सांगितलं की, फ्रेंडशिप मॅरेज म्हणजे समविचारी रूममेट निवडण्यासारखं आहे. अशा लग्नात, जोडीदार ठरवतात की ते घरचा खर्च कसा भागवायचा. कपडे धुणे, साफसफाई आणि इतर कामे एकत्रितपणे कशी होणार?

    ‘फ्रेंडशिप मॅरेज’ ची पसंती कुणाला?

     रिपोर्ट नुसार, 32 वर्षांपेक्षा जास्त वयाचे तरुण या प्रकारच्या लग्नाला प्राधान्य देत आहेत. लग्नानंतरही स्वच्छंजी आयुष्य जगू इच्छिणाऱ्यांनीही या लग्नाला पसंती दिली आहे. किंवा त्यांच्या शारीरिक संबंधांची प्राधान्ये वेगळी असतात, असेही लोक या प्रकाराला पंसत करत आहेत. अशा विवाहांची नोंद ठेवणाऱ्या संस्थेच्या म्हणण्यानुसार, मार्च 2015 पासून शंभरहून अधिक लोकांनी अशाप्रकारे लग्न केले आहेत आणि त्यांचे कुटुंबही देखील वाढवले ​​आहे.