उत्तराखंड बोगदा दुर्घटनेत अडकलेले सर्व ४१ मजूर सुखरूप, पहिल्यादांच फोटो आणि व्हिडिओ आले समोर!

उत्तराखंडच्या उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, चांगली बातमी समोर आली आहे. बोगद्यात अडकलेले सर्व ४१ कामगार सुखरूप असून त्यांना लवकरच बाहेर काढण्यात येईल.

    उत्तराखंडमधील बोगदा दुर्घटनेबाबत (Uttarakhand Tunnel Collapse) मोठी अपडेट समोर येत आहे. बोगद्यात अडकलेले सर्व ४१ कामगार सुखरूप असून त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या कामगारांचे पहिले चित्र समोर आले आहे. या छायाचित्रांमध्ये सर्व कामगार सुरक्षित असून घटनास्थळी चोवीस तास बचावकार्य सुरू आहे. लोकांना बाहेर काढण्यासाठी सिल्कयारा बोगद्यापासून अमेरिकन मशीनद्वारे दुसरा बोगदा तयार केला जात आहे. दिल्लीचे एक पथकही तेथे पोहोचले आहे.

    कामगारांना दिलं जातय अन्न आणि पाणी

    बोगद्यात अडकलेल्या कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पाईपचा वापर केला जात आहे. आता, खिचडी व्यतिरिक्त, कामगारांना कडक अन्न म्हणजे रोटी, डाळ आणि तांदूळ देण्याचे काम देखील केले जात आहे. दरम्यान, पाईपमधून कॅमेरा आत पाठवण्यात आला असून, त्यातून मिळालेली छायाचित्रे हृदयस्पर्शी आहेत. म्हणजे बोगद्यात अडकलेले सर्व कामगार अजूनही जिवंत आहेत. दरम्यान, अधिकार्‍यांनीही कामगारांशी बोलून त्यांची प्रकृती जाणून घेतली आहे. आपत्ती व्यवस्थापनाव्यतिरिक्त 5 एजन्सी वेगवेगळे बचाव कार्य करत आहेत. भारतीय लष्कराच्या एका शाखेला सध्या घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.

    पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री धामींकडून घेतली माहिती

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना फोन करून उत्तरकाशीतील सिल्क्यराजवळ बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली. केंद्र सरकारकडून आवश्यक बचाव उपकरणे आणि संसाधने पुरविली जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. केंद्र आणि राज्य संस्थांच्या परस्पर समन्वयाने कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल. सध्या घटनास्थळी चोवीस तास बचावकार्य सुरू आहे.