राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचे मतदान पूर्ण; उद्या निकाल
मुंबई : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी शनिवारी मतदान पूर्ण झाले. आता या निवडणुकीचे निकाल उद्या (दि.9) जाहीर केले जाणार आहेत. यापूर्वी ५ फेब्रुवारीला होणारे मतदान तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे पुढे ढकलण्यात आले होते. या निवडणुकीत राज्यभरातील ७४३८ उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद झाले आहे.
निवडणुकीची मतमोजणी ९ फेब्रुवारीला होणार असून, त्यानंतर आचारसंहिता उठवली जाणार आहे. १२ जिल्हा परिषद क्षेत्रात सकाळी ७:३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी एकूण २६२४ उमेदवार रिंगणात आहेत. राज्य आयोगाच्या माहितीनुसार, दुपारी दीड वाजेपर्यंत अंदाजे ३७.९४% मतदान झाले होते. रायगड, सोलापूर, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ईव्हीएम संदर्भात तक्रारी समोर आल्या असून, अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया काही काळ ठप्प झाली होती.
अलिबाग येथील कावीर येथे ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदान थांबवावे लागले. त्यामुळे भर उन्हात मतदारांना तासनतास रांगेत उभे राहावे लागले. तर कर्जत तालुक्यातील हलवली येथील मतदान केंद्रावरही अशाच प्रकारचा बिघाड झाल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली.
ईव्हीएम सुरुच झालं नाही
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पाथुर्डी (केंद्र क्र. २२४) येथे ईव्हीएम सुरूच न झाल्याने सकाळच्या सत्रात मतदान रखडले. वेळ होऊनही मशीन प्रतिसाद देत नसल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. तर छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज येथे मत नोंदवल्यानंतर अपेक्षित बीप आवाज येत नसल्याने मतदान तात्पुरते थांबवण्यात आले.
नावांबाबत होता किरकोळ गोंधळ
काही ठिकाणी सकाळच्या वेळेत मतदार यादीतील नावांबाबत किरकोळ गोंधळ निर्माण झाला. प्रशासनाने तातडीने मदत कक्ष सक्रिय करून समस्या सोडवल्याने मतदानावर फारसा परिणाम झाला नाही. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी राखीव यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
स्थानिक प्रश्नांवर मतदारांचे मतदान
राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकीत स्थानिक प्रश्नांवर मतदारांनी मतदान केल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकास हे मुद्दे केंद्रस्थानी असल्याचे मतदारांच्या प्रतिक्रियांतून स्पष्ट झाले. प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर आज प्रत्यक्ष निर्णयाचा दिवस असल्याची भावना सर्वत्र जाणवत होती.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : अंबरनाथमध्ये राजकारणाचा डाव; कॉंग्रेस उमेदवारांवर भाजपचा प्रभाव






