फोटो सौजन्य - Social Media
आजच्या घाईगडीतल्या जगात बाईक किंवा स्कूटर चालवताना हेल्मेट घालणं ही अत्यावश्यक बाब मानली जाते. अपघातांपासून वाचण्यासाठी आपण सगळे हेल्मेट वापरतोच. पण, याच हेल्मेटमुळे आरोग्याला धोका निर्माण होतोय, हे तुम्हाला माहित आहे का? होय, दररोज वापरल्या जाणाऱ्या हेल्मेटच्या आत इतकी घाण साचते की ती बॅक्टेरिया आणि बुरशींसाठी पोषक जागा बनते. जेव्हा आपण दररोज न साफ करता, न विचार करता थेट डोक्यात हेल्मेट घालतो, तेव्हा हजारो सूक्ष्मजंतूंना आपल्या डोक्याची आणि त्वचेची आरोग्याची चावी आपणच देतो.
डोक्याला सतत येणारा घाम, धूळ आणि उन्हामुळे हेल्मेटच्या आतील भाग ओलसर आणि गरम राहतो. याच ओलसरपणामुळे बुरशी आणि बॅक्टेरिया वाढू लागतात. विशेषतः जे हेल्मेट दररोज वापरले जातात आणि वेळेवर स्वच्छ केली जात नाहीत, ती अधिक धोकादायक ठरतात. हेल्मेटचा नियमित वापर करताना योग्य स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे दुष्परिणाम शरीरावर स्पष्टपणे दिसू लागतात. अनेक वेळा आपण लक्ष देत नाही, पण अशा प्रकारची अस्वच्छता वेगवेगळ्या समस्या निर्माण करू शकते. सर्वात सामान्य म्हणजे डोक्यावर फंगल इन्फेक्शन किंवा डँड्रफ. हे प्रामुख्याने सततच्या घाम आणि धूळमुळे होते. हेल्मेटमधील गरम आणि ओलसर वातावरण बुरशी वाढीस पोषक ठरतं. त्याशिवाय, फॉलिक्युलायटिस ही देखील एक गंभीर समस्या असू शकते. यामध्ये केसांच्या मुळांमध्ये सूज येते आणि त्यामुळे जळजळ, वेदना किंवा खाज येऊ शकते. काही वेळा हेल्मेटच्या घाणीतून त्वचेवर फोड-फुंस्या किंवा पिंपल्स निर्माण होतात. बॅक्टेरिया त्वचेवर परिणाम करून चेहऱ्याच्या सौंदर्यावरही घाला घालतात. या सगळ्याच गोष्टींचा दीर्घकालीन परिणाम केसगळतीवर होतो आणि काही प्रकरणांमध्ये टक्कल पडण्याची समस्या देखील निर्माण होऊ शकते.
या सगळ्या त्रासांपासून बचाव करायचा असेल, तर हेल्मेटची स्वच्छता आणि योग्य वापर ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरते. आठवड्यातून एकदा तरी हेल्मेट नीट स्वच्छ करणं गरजेचं आहे. शक्य असल्यास त्याची इनर लाइनिंग काढून धुणं किंवा उन्हात वाळवणं लाभदायक ठरतं. हेल्मेट घालण्यापूर्वी कॉटनचा हलका स्कार्फ किंवा कॅप वापरल्याने थेट संपर्क टाळता येतो आणि घामदेखील थांबतो. इतरांचं किंवा भाड्याचं हेल्मेट वापरणं शक्यतो टाळावं, कारण त्यातून संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो. बाजारात मिळणारे अँटी-बॅक्टेरियल हेल्मेट स्प्रे वापरल्यास देखील बॅक्टेरियांचा प्रादुर्भाव कमी करता येतो.
शेवटी एवढंच म्हणावं लागेल की, हेल्मेट आपल्याला अपघातांपासून वाचवतं हे खरं असलं, तरी जर त्याची नीट काळजी घेतली नाही, तर तेच आपल्या डोक्याचं आणि त्वचेचं शत्रू ठरू शकतं. त्यामुळे हेल्मेट वापरा, पण ते स्वच्छ आणि सुरक्षित पद्धतीनं वापरणं हे आरोग्याच्या दृष्टीने तितकंच आवश्यक आहे.