फोटो सौजन्य: Freepik
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला बजेट सादर झाला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा बजेट सादर केल्यानंतर सर्ब क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. 2024 च्या अर्थसंकल्पाला ऑटोमोबाईल क्षेत्राने कोणत्या प्रकारचा प्रतिसाद दिला आहे, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
SIAM ची प्रतिक्रिया
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सचे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी बजेट 2024 चे स्वागत केले आहे. ते म्हणाले की भारतीय ऑटोमोबाईल उद्योग अनेक घोषणांसह आर्थिक वाढीवर सतत लक्ष केंद्रित करण्याच्या धोरणाचे स्वागत करतो. विशेषत: पुढील पाच वर्षांमध्ये पायाभूत सुविधा तसेच ग्रामीण विकास आणि पायाभूत सुविधांसाठी 2.66 लाख कोटी रुपयांच्या उदार वाटपाच्या घोषणा हे एक स्वागतार्ह पाऊल आहे जे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देईल. लिथियम, कोबाल्टसह दुर्मिळ खनिजांच्या आयातीवरील कस्टम ड्यूटीत आणि लिथियम आयन बॅटरीवरील किंमतीत सूट देणाऱ्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
FADA ने ही केले स्वागत
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) ने ही या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. FADA चे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया म्हणाले की, भारत सरकारने नुकत्याच केलेल्या अर्थसंकल्पातील घोषणा ऑटो रिटेल क्षेत्रासाठी आशावाद आणि आव्हाने यांचे मिश्रण आणते. प्रमुख पिकांसाठी किमान आधारभूत किंमती वाढवणे आणि PMGSY चा चौथा टप्पा सुरू करणे ही सकारात्मक पावले आहेत ज्यामुळे ग्रामीण उत्पन्न वाढेल आणि कनेक्टिविटी सुधारेल. ज्यामुळे ग्रामीण भागात वाहन विक्री वाढेल.
Mercedes Benz ची प्रतिक्रिया
बजेट सादर झाल्यानंतर लक्झरी वाहन निर्माता कंपनी मर्सिडीज बेंझकडून प्रतिक्रिया आली आहे. मर्सिडीज-बेंझ इंडियाचे एमडी आणि सीईओ संतोष अय्यर म्हणाले की, सरकारने बजेटमध्ये आपले प्राधान्यक्रम स्पष्टपणे सांगितले आहेत. वाढत्या भारतीय अर्थव्यवस्थेचा भक्कम पाया रचण्याचे या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट आहे. जीडीपीच्या 3.4% वाटपासह, पायाभूत सुविधा प्रकल्पांवरील भांडवली खर्च सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्य आहे याचा आम्हाला आनंद आहे. बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांवरील कमी GST दीर्घ कालावधीसाठी सुरू ठेवला जाईल अशी आमची अपेक्षा आहे.
Hero Motocorp ची प्रतिक्रिया
हिरो मोटोकॉर्प ही देशातील आघाडीची दुचाकी निर्माण करणारी कंपनी आहे. याच कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. पवन मुंजाल यांनीही अर्थसंकल्पावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की 2024 चा अर्थसंकल्प हा आपल्या अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यासाठी आणि शाश्वत भविष्याला चालना देण्यासाठी डिझाइन केलेला एक दूरदर्शी आणि व्यावहारिक बजेट आहे.