फोटो सौजन्य- iStock
ऑटोमोबाईल क्षेत्र हे आधुनिक युगातील सर्वात महत्वाचे आणि वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. गेल्या काही दशकांमध्ये या क्षेत्रात कमालीचे बदलही पाहायला मिळत आहेत. या बदलांसोबत क्षेत्रामधील संधींचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. वाहन उत्पादन, सेवा, विक्री, तसेच तांत्रिक नाविन्य यामध्ये सतत सुधारणा होत असल्यामुळे या क्षेत्रात करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. एकेकाळी फक्त मोठ्या वाहन उत्पादक कंपन्या या क्षेत्रात होत्या, आता मात्र ईव्ही वाहन निर्मितीपासून , तांत्रिक सेवा आणि संगणकीय प्रणाली यांच्यामुळेही विविध क्षेत्रात काम करण्याचे पर्याय निर्माण झाले आहेत.
ऑटोमोबाईल क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवश्यक शिक्षण
ऑटोमोबाईल क्षेत्रात करिअर करण्यासाठी विविध शैक्षणिक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर अभियांत्रिकी ( Engineering) यांचा समावेश होतो. अभियांत्रिकी अभ्यासक्रमानंतर उच्च शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरही विशेष अभ्यासक्रम केले जाऊ शकतात. तांत्रिक ज्ञानाबरोबरच संगणकीय कौशल्ये, डेटा विश्लेषण, डिजाईन सॉफ्टवेअरचे ज्ञान (जसे CAD, CAM) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचेही महत्त्व वाढले आहे. त्यामुळे पदवीसोबतच या तांत्रिक ज्ञानाशी निगडीत कोर्स केल्यास त्याचा फायदा होताना दिसत आहे.
क्षेत्रामधील नवनवीन संधी
इलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढल्यामुळे या क्षेत्रात तंत्रज्ञान आणि संशोधनाचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. तसेच, सोलर वाहने, ऑटोनॉमस कार, आणि स्वच्छ इंधनांवर चालणारी वाहने विकसित करण्याच्या दिशेने काम सुरू आहे. EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, डेटा सायन्स, वाहनांच्या ऑटोमेशन सिस्टीमसाठी AI, सेन्सर्स आणि IoT या तंत्रज्ञानावर विशेष भर दिला जातो. या सर्व गोष्टींमुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात विविध प्रकारच्या जॉब्सची मागणी आहे, जसे की प्रोडक्ट डिझायनर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, डेटा सायंटिस्ट, रिसर्च इंजिनियर, सप्लाय चेन मॅनेजर, आणि सॉफ्टवेअर इंजिनियर इत्यादी.
आज जगभरात अनेक कंपन्या ऑटोमोबाईल क्षेत्रात कार्यरत आहेत. भारतातील नामांकित ऑटोमोबाईल कंपन्यांमध्येही मोठ्या प्रमाणात कौशल्यपुर्ण मनुष्यबळाची मागणी असते. त्यामुळे या क्षेत्रात देशातही मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. हे क्षेत्र सतत बदलत असलेले आहे आणि त्यात टिकून राहण्यासाठी तांत्रिक कौशल्यांचे अद्ययावत ठेवणे अत्यावश्यक आहे. तसेच, नवनवीन तंत्रज्ञान आणि त्यांच्या वापरामुळे वाहन निर्मिती प्रक्रिया अधिक जटिल झाली आहे. इंधनाच्या किमती, पर्यावरणीय नियमावली, आणि ग्राहकांची बदलती अपेक्षाही या क्षेत्रातील मोठी आव्हाने असली तरीही या क्षेत्रामध्ये नवनवीन विकासात्मक बाबी होत आहेत. त्यामुळे जर तुमचे लक्ष्य निर्धारित असेल तर या क्षेत्रात तुम्ही उतुंग भरारी घेऊ शकता. करिअर करिता ऑटोमोबाईल क्षेत्र हे सर्वोत्तम क्षेत्रही ठरु शकते.