गेल्या दशकात भारतीय क्रिकेट संघाबाबत एक प्रश्न सातत्याने सर्वसामान्य भारतीय क्रिकेटरसिकांच्या मनात घोळत असतो. २०११ पासून भारताकडे एकही आयसीसी क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी का नाही? आज आर्थिक आघाडीवर जागतिक क्रिकेटमध्ये भारतच महासत्ता आहे. तिजोरीतील पैशांचे प्रतिबिंब खेळाडूंच्या, संघाच्या मैदानावरील कामगिरीवर का पडत नाही? कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानापर्यंत पोहोचणे. गेल्या दोन्ही कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारणे. मालिका जिंकणे. यानंतरही आपण आयसीसीच्या स्पर्धेत का विजयी होत नाही? याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी प्रमुख कारण आहे, योग्य खेळाडूंची, योग्य वेळी संघात निवड न करणे. त्यासाठी चांगला अनुभव असलेल्या निवड समिती सदस्यांचा अभाव. क्रिकेटची योग्य जाण असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा अभाव. आयपीएल आणि अन्य मार्गाने मिळणाऱ्या प्रचंड पैशामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळेच प्रत्येक स्पर्धेगणिक सतत चुकांची पुनरावृत्ती होत आहे.
आता यंदाच्या विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघांचेच पाहा ना. सर्वसामान्य क्रिकेटरसिकांना पडलेला प्रश्न आहे; भारतात होणाऱ्या या स्पर्धेत संघात एकही नियमित ऑफ स्पिनर का नाही? विश्वचषकातील ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, इंग्लंड, दक्षिणआफ्रिका, पाकिस्तान या संघांना आपण जर आपले प्रमुख प्रतिस्पर्धी मानतो तर या संघांतील डावखुऱ्या फलंदाजांची संख्या पाहा. ऑस्ट्रेलियाकडे डेव्हिड वॉर्नर, ट्रॅविस हेड, मॅथ्यू वेड, अॅलेक्स कॅरी, अॅस्टन अॅगर, मिशेल स्टार्क, अशी डावखुऱ्या फलंदाजांची फळी आहे; जी भारतीय गोलंदाजीसाठी डोकेदुखी ठरू शकेल. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा आयपीएल स्पर्धेत खेळण्याचा अनुभव आणि गतसालीच झालेल्या भारताविरुद्ध मालिकेतील अनुभव कामी येणार आहे. जी गोष्ट भारतासाठी काळजी करायला लावणारी असेल.
गतविजेत्या इंग्लंड संघावर नजर टाकल्यास हाच धोका स्पष्ट दिसत आहे. कप्तान जोस बटलर राजस्थान रॉयल्सचा गेली कित्येक वर्षे आयपीएल स्पर्धेचा तारणहार आहे. सोबत मोईन अली, सॅम करन, बेअरस्टो, जेसन रॉय, बेन स्ट्रोक्स, मार्क वूड, लिविंग स्टोन यांना भारतीय खेळपट्ट्यांचा पूरता अनुभव आलेला आहे. आणि त्यांच्या संघातील पाच डावखुऱ्या फलंदाजांची संख्या भारतासाठी डोकेदुखी ठरू शकेल. दक्षिण आफ्रिकेचे डेव्हिड मिलर, क्विंटन डीकॉक हे डावखुरे मॅचविनर आहेत, हेही लक्षात घ्यायला हवे. श्रीलंका, पाकिस्तान आणि अन्य नवोदित संघातील खेळाडूंच्या डावऱ्यांना देखील आवरताना ११ ते ४३ षटकांच्या मधल्या काळात आपली गोलंदाजी कशी कामगिरी करील हे देखील महत्त्वाचे आहे. कारण ५० षटकांच्या सामन्यात चेंडूची लकाकी गेल्यानंतर मधल्या काळात म्हणजे साधारणत: १५ ते ३५ किंवा ४० षटकादरम्यान आपले गोलंदाज कशी गोलंदाजी करतात, त्यावरच आपले यश अवलंबून आहे. या काळात तुमच्याकडे अनुभवी फिरकी गोलंदाज असणे गरजेचे आहे. आपल्याकडे दोन फिरकी गोलंदाज आहेत; ते दोन्हीही डावखुरे. खेळपट्टी फिरकीला पोषक असेल तरच अक्षर पटेल प्रभावी ठरतो, हा आजवरचा अनुभव आहे. जाडेजाची भेदकता किंवा विकेट घेण्याची क्षमता, खेळपट्टीच्या पृष्ठभागावरील बदलांवर अधिक अवलंबून असते.
निवड समितीने भारतीय संघांची फलंदाजी बळकट करण्याच्या नादात एका ऑफ स्पिनरचा बळी दिला. त्याऐवजी त्यांनी शार्दूल ठाकूरला निवडले. शार्दूल ठाकूरची गोलंदाजी नियमित ऑफ स्पिनरची उणीव भरून काढणार आहे का? शार्दूल ठाकूर इतक्या धावा ऑफ स्पिनर आर. अश्विन देखील काढण्याची क्षमता राखून आहे. अश्विनचे जर वावडे होते तर वॉशिंग्टन सुंदर हा देखील त्या जागेसाठी उत्तम पर्याय ठरू शकला असता.
त्यापुढे जाऊन जर निवड समिती भारताचा, भविष्यातील संघ स्थिरस्थावर करण्याच्या प्रयत्नात असेल तर त्यांनी देशातील स्थानिक स्पर्धाही प्रत्यक्षात पाहून, खेळाडूंच्या कामगिरीचे अचूक मूल्यमापन करणे गरजेचे होते. भारतीय क्रिकेट संघ दौऱ्यावर असताना, देशांतर्गत स्थानिक क्रिकेटमध्ये, दुलीप आणि देवधर करंडकाच्या स्पर्धाही सुरू होत्या. या स्पर्धांमध्ये रियान पराग याची ऑफ स्पिनर म्हणून कामगिरी अतिशय प्रभावी होती. त्याने प्रत्येक सामन्यात २ ते ३ बळी घेतले होतेच. एका सामन्यात ५ बळीही नोंदविले होते. दुसरीकडे त्याची ७० चेंडूतील १२० धावा, १०० धावा, ९० धावा अशी फलंदाजीही पूर्ण बहरात होती. भारतीय संघाच्या फलंदाजीतील खोली जर वाढवायची होती तर रियान पराग हा अष्टपैलू ऑफ स्पिनर एक उत्तम पर्याय ठरू शकला असता.
ऑफ स्पिनर संघात नसणे भारतासाठी भारतीय खेळपट्ट्यांवर किती त्रासदायक ठरू शकेल, हे येणारा काळच सिद्ध करू शकेल. डावखुरे फलंदाज ही जशी डोकेदुखी आहे तसेच भारतीय संघातील अवघ्या दोनच डावखुऱ्या फलंदाजांची उपस्थिती प्रतिस्पर्धा गोलंदाजांसाठी लाभदायक ठरू शकेल. इशांत किशन आणि रविंद्र जाडेजा यांचेच डावखुरेपण भारताला लाभदायक ठरू शकेल. इशांत किशनवर संघ व्यवस्थापन किती भरवसा ठेवणार हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरू शकेल.
आणखी एका गोष्टीचे आश्चर्य वाटते. ते म्हणजे इस्पितळातून अलिकडेच “डिस्चार्ज” मिळालेल्या खेळाडूंवरचा निवड समितीचा विश्वास. भारतामध्ये खेळाडूंचे एवढे दुर्भिक्ष्य आहे का? की ज्यामुळे हे खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त आहेत का, याची चाचपणी होण्याआधीच त्यांना संघात निवडले गेले? गेली दोन वर्षे भारतीय निवड समिती स्थिरस्थावर असणाऱ्या भारतीय संघांची निवड करू शकली नाही. भारतीय संघांची जर जडणघडण करायची असेल तर तेच तेच खेळाडू, जे सातत्याने अपयशी ठरत आहेत. काही खेळाडूंच्या फिटनेसच्या समस्या कायम आहेत. अशा खेळाडूंवर विश्वास आपण किती काळ टाकत राहणार? भारतीय संघाला अजूनही ३-४-५ क्रमांकावरचे स्थिर खेळाडू मिळत नाहीत. रोहित शर्मा, के. एल. राहूल यांची सलामीची जोडी वर्तमान काळात कोणत्या स्थानावर आहे? त्यांची दर्जेदार गोलंदाजीच्या आक्रमणासमोर कामगिरी काय आहे? विराट कोहलीला नेमके कोणत्या स्थानावर खेळायला लावणार? पहिल्या पाच क्रमांकाच्या फलंदाजांमध्ये जर सातत्य नसेल तर नवोदितांना कधी आजमावणार?
बुमरा, शामी, सिराज या वेगवान गोलंदाजांच्या संपूर्ण हंगामातील तंदुरुस्तीची, फिटनेसची खात्री नसताना भारताकडे अन्य कोणते पर्याय आहेत? भारतीय फिरकी गोलंदाजीतही आपण सुसूत्रपणा कधी आणणार? धरसोड वृत्ती कधी सोडणार? संघनिवडीची धोरणे कप्तान आणि प्रशिक्षकानुसार बदलत जातात. निवड समिती सदस्यांच्या विचारसरणीप्रमाणे ठरत जातात. मात्र, संघनिवडीचा गाभा भारताचा भावी संघ निवडणे हेच असायला हवे. भारतीय संघ विंडिज दौऱ्यावर असताना निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, संघाच्या निवडीचा “रोड मॅप” ठरविण्यासाठी अमेरिकेतील “मयामी” या ठिकाणी गेले होते. एवढा दूरवरचा प्रवास करून त्यांनी कोणता ‘रोड मॅप’ पाहिला. त्यांना त्यात फक्त खाचखळगेच दिसले काय? कारण अपेक्षा होती; नव्या, ताज्या रक्ताला वाव देणारी संघनिवड असेल. परंतु मयामीपर्यंत जाऊनही तोच संघ कायम ठेवायचा होता तर मग एवढा “द्रविडी प्राणायाम” कशासाठी करायचा? स्थानिक स्पर्धांमधील कामगिरीचा, सध्याच्या फॉर्मचा विचार होणार नसेल, तर कोणता ‘मॅप’ आखण्यात येईल, याची कल्पना आतापासूनच यायला लागली आहे.
– विनायक दळवी