लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच तेलंगणा, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्याची आताच तयारी भाजपनं सुरू केली आहे. कर्नाटक आणि पुद्दुचेरीत भाजपची सत्ता आहे. गेल्या वर्षी हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत भाजप ज्या पद्धतीनं उतरला होता आणि ज्या पद्धतीनं तिथं जागा जिंकल्या, ते पाहिलं, तर भाजप आता तेलंगणातही तेलंगणा राष्ट्र समितीला पर्याय ठरू पाहतो आहे. त्यातच गेल्या दोन वर्षांत तेलंगणा राष्ट्र समितीनं भाजपचं हे आव्हान ओळखून भाजपविरोधात मोहीम उघडली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, शरद पवार, एम. के. स्टॅलिन यांच्यांशी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे संबंध चांगले झाले आहेत.
राव यांनी राष्ट्रीय राजकारणात उतरून मोदी यांना पर्याय तयार करण्याची मनीषा बाळगली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपनं राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये घेतली. हैदराबादचं नामकरण भाग्यनगर करण्याची भाषा वापरून त्यातून ध्रुवीकरणावर भर दिला आहे.
हैदराबादमध्ये दोन दिवस चाललेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुस्लीम समाजातील मागासलेल्या घटकांमध्ये प्रवेश करण्याची रणनीती आखण्यात आली. तेलंगणातील सरकार कुटुंबवादी आणि भ्रष्ट असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला डबल इंजिन सरकार स्थापन करण्याचं आवाहन केले.
हैदराबादमध्ये १८ वर्षांनंतर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ही तिसरी बैठक आहे. गेल्या पाच वर्षांत दिल्लीबाहेर पक्षाची ही पहिलीच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होती. तेलंगणात भाजप पाय पसरण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असताना ही बैठक झाली.
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीचा समारोप अनेक अर्थानं महत्त्वाचा ठरला असून, हैदराबादच्या परेड ग्राउंडवर झालेल्या विजय संकल्प सभेला संबोधित करून पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीचा समारोप केला. रॅलीत त्यांनी आपला हेतू स्पष्ट केला. ते म्हणाले की, तेलंगणातील लोक दुहेरी इंजिन विकासासाठी तळमळत आहेत.
राज्यात भाजपची सत्ता आल्यावरच त्यांचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. भाजपची सत्ता आल्यावर या राज्यातील विकासाचा वेग वेगवान होईल. मोदी म्हणाले की, हैदराबाद हे भाग्यनगर आहे. हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. सरदार पटेल यांनी हैदराबादच्या निजाम संस्थानचा भारतात समावेश करून एक भारताचा पाया घातला होता. तो मोडण्याचे अनेक प्रयत्न झाले.
आता श्रेष्ठ भारत बनवण्याची ऐतिहासिक जबाबदारी भाजपची आहे. तेलंगणा हा तेलंगणा राष्ट्र समितीचा मजबूत बालेकिल्ला आहे. शिवसेनेसारखी तिथं फूट पाडता येईल, अशीही स्थिती नाही. केसीआरचा हा बालेकिल्ला मिळवणं भाजपसमोर मोठं आव्हान आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ एक जागा जिंकता आली.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्याच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं पाच जागा जिंकल्या होत्या. असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षानं सात जागा लढवून सर्व जागा जिंकल्या. केसीआरच्या तेलंगणा राष्ट्र समितीनं ११९ पैकी ८८ जागा जिंकून ४६.९ टक्के मतं मिळवून पुन्हा सत्तेत आली.
प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस २८.५ टक्के मतांसह केवळ १९ जागांवर घसरली. अशा परिस्थितीत तेलंगणात आपला विस्तार करणं हे भाजपसमोर मोठं आणि खडतर आव्हान आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांना पंतप्रधान मोदी यांच्या हेतूची आधीच कल्पना होती.
पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी त्यांनी त्यांच्या एका मंत्र्याला विमानतळावर पाठवलं, तर विरोधी पक्षाचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार यशवंत सिंह यांचं स्वागत करण्यासाठी ते स्वतः विमानतळावर पोहोचले. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांच्या खासदार आणि आमदारांना यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देण्याचं त्यांनी आवाहन केले.
केसीआर यांनी मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी मोदी यांना विचारलं की, तुम्ही पहिल्यांदा निवडून आलात तेव्हा तुम्ही अनेक आश्वासनं दिली होती. किमान एक वचन तरी पूर्ण झालं आहे का? केसीआर म्हणाले की, तुम्ही टॉर्च लावून शोध घेतला तरी सापडणार नाही. केसीआर म्हणाले की, मोदी यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू असं सांगितलं होतं; मात्र त्याऐवजी खर्च वाढला आहे.
शेतकरी आंदोलनात ७०० शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. देशात राजकीय परिवर्तन झालं पाहिजे. सर्व संस्थात्मक संस्थांचा गैरवापर होत आहे. लोकशाहीची हत्या होत आहे, असे आरोप त्यांनी भाजप आणि मोदी यांच्यावर केले. रॅलीच्या मंचावरून उत्तर देण्याचं आव्हान करण्यावर केसीआर थांबले नाहीत.
मोदी यांनी पंतप्रधान म्हणून नव्हे, तर व्यापारी म्हणून श्रीलंकेचा दौरा केल्याचा आरोप त्यांनी केला. श्रीलंकेच्या संसदीय समितीच्या अध्यक्षांनी संसदेत म्हटलं आहे की, भारत सरकारच्या दबावाखाली त्यांनी भारतीय उद्योगपतीला हे कंत्राट दिलं आहे. केसीआर म्हणाले की, मोदी खरे असतील तर श्रीलंकेत काय झालं ते जाहीर सभेत सांगा.
आपल्याकडं शंभर वर्षांचा कोळशाचा साठा असताना तुम्ही तो बाहेरून का विकत घेत आहात, असा सवाल त्यांनी केला. २०१४ मध्ये हीच तेलंगणा राष्ट्र समितीची भाग होती; पण नंतर त्यांनी एनडीए सोडला आणि पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात आघाडी उघडली.
२००८ मध्ये भाजपनं कर्नाटकात पहिल्यांदा सरकार स्थापन केलं. आता त्याचं लक्ष तेलंगणावर आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळमध्ये हळूहळू पाय रोवण्याचं उद्दिष्ट आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ईशान्येकडील राज्यांच्या सर्व समस्या सोडवल्या पाहिजेत, जेणेकरून भाजप या प्रदेशात कायमस्वरूपी सत्ताधारी पक्ष राहील, या मुद्द्यांवर कार्यकारिणीत उघडपणे चर्चा झाली. याशिवाय भाजपच्या प्रभावापासून अस्पर्श असलेल्या ओडिशासारख्या राज्यातही प्रचाराची रणनीती बनविण्यावर भर देण्यात आला.
बैठकीत पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका प्रत्येक राज्यातील परिस्थितीनुसार नव्या ‘सोशल इंजिनीअरिंग’नुसार लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील ३०-४० वर्षे भाजप देशावर राज्य करेल आणि या काळात भारत विश्वगुरू बनेल, अशी घोषणा गृहमंत्री अमित शाह यांनी केली; मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी दावा केला होता की, पुढील ५० वर्षे भाजपला सत्तेपासून कोणीही दूर करू शकणार नाही.
सीएए लागू करण्यास विलंब होत असला तरी सरकार कोणत्याही परिस्थितीत त्याची अंमलबजावणी करत राहील. याशिवाय प्रत्येक राज्यात लोककल्याणकारी योजनांच्या लाभार्थींचं मतांमध्ये रूपांतर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यावर भाजपनं भर दिला आहे. भाजपनं आता उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मुस्लिमांना एकत्र आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्याचं ठरवले आहे.
उल्लेखनीय आहे की, उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत कल्याणकारी योजनांचे लाभार्थी म्हणून मुस्लिमांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. याचं शास्त्रीय विश्लेषण करून या मोहिमेला गती देण्याच्या सूचना मोदी यांनी दिल्या आहेत. भाजपला दलित आणि पसमांदा मुस्लिमांसोबत काम करण्यास सांगितलं आहे.
सय्यद, शेख, पठाण हे उच्चवर्णीय मुस्लीम आहेत, तर अन्सारी, कुरेशी, अल्वी, सैफी, सलमानी, इद्रीसी आणि रैन यांसारखे पसमंद मुस्लीम आहेत. भाजपला आशा आहे, की ते पसमांदा मुस्लिमांना हे पटवून देऊ शकतील की, ते त्यांच्या उन्नतीसाठी वचनबद्ध आहेत.
हैदराबाद येथे झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचा देशभर प्रसार करून सत्तेचा एकमेव आणि कायमस्वरूपी पर्याय म्हणून काम करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी निश्चित केलेली अनेक उद्दिष्टं हे पक्षासाठी हिमालयाएवढं मोठं आव्हान आहे; परंतु गंतव्यस्थानाकडं टाकलेलं प्रत्येक पाऊल तिथपर्यंत पोहोचण्याचं अंतर कमी करतं, असं भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाचं मत आहे.
भागा वरखडे
warkhade.bhaga@gmail.com






