अहिरांची भाषा ती अहिराणी, कृष्ण कान्हाचा खान्देशची भाषा अहिराणी- हजारो वर्षापूर्वी या प्रांताला खांडव वन असे म्हणत. एरंडोल ‘पद्मालय’ येथे ‘भीम-बकासूर’ यांचे युद्ध झाल्याची दंत कथा आहे. पाचव्या शतकात ‘अभिर’ लोकांचा समूह खान्देशात होता-भरत नाट्य शास्त्रात. अहिराणी भाषा बोली भाषा आहे. असा उल्लेख आढळतो.
कविश्रेष्ठ निंबाजी यांनी १६४८ मध्ये लिहिलेल्या ‘पोथी’ वाङ्मयात अहिराणी भाषेचा वापर केला आहे. १६८० ते १७५० च्या दशकात कविराज कमलनयन यांच्या ग्रंथात अहिराणी भाषेचा उल्लेख आहे. वारकरी संप्रदायात संत एकनाथांनी अहिराणी भारुड लिहिले आहे. माऊली ज्ञानेश्वरांनी अहिराणी गवळण लिहिली आहे. आपल्या एका एका श्रृंगार रसाच्या ओवीत माऊली लिहितात….
‘यसोदेना बाय तान्हा
माले म्हणे हाई लेवो।
मीत बाई साधी भोई
गऊ त्याना जवई।
यईसन बिलगना
फाडी मनी चोयी।।।
नंतरच्या कालखंडात ‘बहिणाबाई’च्या गीतात अहिराणीची लय सापडली. खान्देशात तपस्वी साहित्यिक दा. गो. बोरसे यांनी अहिराणी भाषेतली एकोणवीस दर्जेदार ग्रंथनिर्मिती केली. कन्नडचे डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी अहिराणी शब्द, म्हणी, उच्चार यावर पीएच्.डी. केली. डॉ. बापूराव देसाई यांनी ‘आख्खी हयात’ ही कादंबरी लिहिली. अमळनेरचे कृष्णा पाटील यांच्या अहिराणी लोकसंस्कृतीच्या ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला.
मुंबई नगरीत राहून बाहू हटकर यांनी अहिराणी संशोधनालाच आपले व्रत मानले. अहिराणीच्या सखोल अभ्यासामुळे डॉ. सयाजी पगार, डॉ. उषाताई सावंता कविराज सुभाष अहिरे, एकाच दिवशी १२-१२-२०१२ साली बारा पुस्तकांचे प्रकाशन करणारे कापडण्याचे रामदास वाघ- महाराष्ट्राच्या प्रत्येक शाळेत अहिराणी प्रबोधनाची गाणी पोहचवणारे स्व. दीपक निकम, रंजन खरोटे, लीलाताई मराठे, शाहीर करीम शेख, शाहीर हरीभाऊ पाटील, शाहीर भिका पाटील, प्रकाश पाटकरी या सर्वांना प्रेरणा देणारे खान्देश कवि नागेश मोगलाईकर यांना विसरणे शक्य नाही.
‘अहिराणी’ ही मौखीक भाषा आहे’ असे म्हणणाऱ्या त्या काळच्या विचारांना अहीराणी ही बोलीभाषाच आहे. ती एक विचारधारा आहे. एक संस्कृती आहे हे आता मान्य झालं आहे.
महाराष्ट्राच्या धुळे, जळगाव, नाशिक, बागलाण, नंदुरबार भागात ही भाषा सर्रास वापरली जाते. बऱ्हाणपूरमध्ये आणि सुरतमध्ये तर अहिराणी भाषाच जास्त ऐकायला मिळते. खान्देशात आदिवासी-कोकणी- गुजर- बिलोरी भाषांमध्ये अहिराणी शब्दांचा वापर आढळतो. खान्देशातल्या ‘कानबाई’ उत्सवाला तर अहिराणी गीतांचाच वापर होतो.
प्राचीन काळापासून अभिरांची म्हणजे अहिरांच्या भूमीत अहिराणी बोलीभाषा रुजत गेली. शहरनिहाय तिचे शब्द, लय बदलत गेले. मध्यवर्ती अहीराणी, बागलाणी-डांगी-राजस्थानातील नेमाडी-नाशिक खान्देशात लाडाशिक्की- उदाहरण घ्यायचे झाले तर मराठीला इकडे-तिकडे शब्द … जळगांवकडे ‘आथा-तथा’ तर साक्रीकडे ‘इबाक-तिबाक’ असं म्हणतात. असाच ‘मी जातो’ हा शब्द मी निघंस- मी जास, मी ढळस असा प्रकट होतो.
अहिराणी म्हणी वाक्प्रचारचा तर खूप मोठा खजिना अभ्यासकांनी शोधून काढला. सहज गमतीशीर काही म्हणी वाक्प्रचार, काही गमतीदार असतात? उदा.
आंबानी कमाई- निंबूमा गमाई
कयेना वये- चालनी धुये
घाटा खावो-पण वटमा राहो
वावरमा नको नाला- घरमा नको साला
बाप बंजारा- माय पिंजारा
जसे अहिराणीचा शब्दांचा खजिना आहे. तसा अहिराणीची खाद्य संस्कृती आता भारतभर लोकप्रिय होत चालली आहे. ‘मोदक’ला धोंडफय, बाजरीच्या भाकरीला मेंगरा चानकी- सर्व कडधान्य एकत्र करून त्याचे पीठ करून केलेली ‘कयनानी भाकर’ बाजरीची खिचडी- जिला अहिराणीत ‘ढासलं’ म्हणतात. वांगानं भरीत, पुडन्या पिठन्या पाटोड्या, गव्हाची खिचडी जिला ‘थुली’ म्हणतात. पुरणपोळीच्या डाळीच्या पाण्याचा सार करून त्यात ‘पिठाचे’ तुकडे सोडले की त्याला ‘डुबुक वड्या’ म्हणतात.
अहिराणी वाङ्मयाचा सखोल अभ्यास करून ग्रंथसंपदा निर्माण केली. मुंबईचे बापू हटकर तर अहिराणीला प्रमाण भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सतत मागणी करीत आहेत. या सर्वांच्या सामुदायिक प्रयत्नांमुळे आज अहिराणीचे सहा अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलने झालीत. अनेक चित्रपट, लघुपट, नाटके अहिराणी भाषेत झालीत.
अहिराणीची लग्नाची गाणी ‘आयतं पोयतं कोणले आणं?’ आखाजीचे गाणे
अथानी कैरी- तथानी कैरी
कैरी झोका खाय व्ह
कैरी तुटणी खडक फुटणा
झुयझुय पाणी व्हाय व्ह…
खान्देशातले कानबाईचे गाणे-
‘डोंगर हिरवागार
माय तुना डोंगर हिरवागार’
अहिराणीचे ‘आई’वरचे गाणे-
‘माय-माय करू माय
सोनानी परात
मायना बिगर
चित्त लागेना घरात’
जळगावच्या राजाभाऊ महाजनांनी तर अहिराणीत रुबाई हा प्रकार लिहिला. चंद्र आणि घरातला दिवा यांचे नाते
सांगतांना ते लिहितात-
‘सांगसु चांदले रातले
मना दिवामान बयजो
रात कशी येडी व्हस …
मना डोयामान देखजो…’
इंग्रजीला भाषेला वाघीणीचे दूध म्हणतात. मराठी भाषेला अमृताशी पैजा जिंकणारी भाषा म्हणून मान्यता मिळाली. अहिराणी भाषा ही देखील खान्देशची महाराणी ठरली आहे. ‘अहीराणी’ ही आता लोकसंस्कृतीची लोकजीवनाची भाषा झाली आहे. अहिराणचे सण, उत्सव, गाणे, खाद्य पदार्थ लोकांचे पेहराव, स्त्रियांचे दागिने आखाजीचे झोके-देशभरात चाललेले अहिराणीचे महोत्सव- ही आपुली अहिराणी देशात अनेक वळणावर शब्दाने तिच्या लयीने बोलण्याच्या लकबीने बदलत जाते… धुळ्याची अहिराणी-जळगावची नाशिक अहिराणी-बागलाणची बुऱ्हाणपुरची अहिराणी सुरत, नंदुरबारची अहिराणी- आपले वाङ्मयीन सांस्कृतिक सौंदर्य प्रक़ट करते. आता तर कलापथक- तमाशा- किर्तनाबरोबरच दूरदर्शनच्या महाराष्ट्राचा हास्यजत्रा मालिकेत खान्देशचे सचिन गोस्वामी, शाम राजपुत अहिराणी भाषेचा गोडवा प्रकट करतात.
१९५४ वर्षातल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष मामा वरेरकर यांनी अहिराणीला प्रमाण भाषेचा दर्जा मिळावा हा ठराव मांडला.
लग्न आणि अहिराणी भाषा याचे अनेक वर्षापासून अतुट नाते आहे. लग्नाच्या प्रत्येक प्रसंगावर गाणे आहे. आता लग्नाचे जेवण काय असते? त्यावर ही गीत
‘‘सोनानं संपूट वर पुजाले गणपती
अशी देवु पहिली पंगत
दाय भात वरण जिलबीनी
अशी मना बापनी करनी
सगाले लाई दिनी झुरणी’’
अहिराणी भाषेच्या कवितेत आता विद्रोहही डोकावु लागला आहे. सोप्या शब्दात समाज व्यवस्थेला हादरा देणाऱ्या कविता बोली भाषेतून लिहिल्या जात आहेत. बिलोरी भाषेत दोनच ओळीत वहारु सोनवणे किती प्रचंड आशय निर्माण करतात….
ऊसाचा ‘रस’ पिणारी माणसं
आणि
माणसांचा ‘रस’ पिणारे ऊस….
स्वर्गीय लोक कवि दीपक निकम… आजची लोकशाही स्त्रियांचे अत्याचार, मुलींवरचे निर्घृण हल्ले का थांबवु शकत नाही. हा प्रश्न मांडणारी त्यांची अहिराणी कविता विचार करायला लावते.
रगतन पातय भरेल
कपायना कुकुबी गया पुसायी
अशी एक दु:खी कष्टी
लाचार बाई, अर्धी रातले
अुनी मना घर…
थाप दिनी मना दारवर
मी दार उघाडं, तिले इचारं,
बाई व , तु इतला रातले
काबरं अुनी तुले कोन जोयजे?
तिनी डोकावरना पदर सावरीसन गयामधला हुंदका आवरीसन ती बोलनी, भाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेसना पत्ता माले सांग, त्या कुठे ऱ्हातस? मी जसा इचारमा पडणु, वादयमा सापडणु मी तिले इचारं फिरीसन बाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसेना पत्ता तुले काबरं जोयजे? त्या तुना कोन शेत? तू त्यासनी कोण लागस? तिनी डोकावरना पदर सावरीसन पोटमधला हुंदका आवरीसन बोलनी भाऊ, गोट मोठी नाजुक शे ‘शील’
आणि इज्जत बाबतमा शे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मना बाप शे मी त्यास्नी लेक लाडकी प्यारी शे मनं नाव सव्वीस जानेवारी शे. असे अहिराणीचे ओवी, गाणी, चित्रपट, नाटकाचा हा प्रवास अहिराणी साहित्याचा, संस्कृतीचा प्रवास आता जगभरात अभ्यासाचा विषय झाला आहे.
जय खान्देश ! जय अहिराणी !!
जगदीश देवपुरकर
(लेखक ज्येष्ठ कवी आहेत)
kavijagdish2712@gmail.com