तीन मित्रांचा ड्रॅगन लागवडीचा यशस्वी प्रयोग; मिळवतायेत एकरी ७ ते ८ लाखांचे उत्पन्न!
सध्याच्या घडीला अनेक तरुण शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करताना दिसून येत आहे. पारंपारिक पिकांना फाटा देत, आधुनिक पद्धतीने नवनवीन पिकांची लागवड करण्यास शेतकरी प्राधान्य देत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका तरुण शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्याने दोन मित्रांच्या मदतीने ड्रॅगन या विदेशी फळाची यशस्वी शेती फुलवली आहे. ज्यातून त्यांना यावर्षी वर्षी प्रत्येकी ७ ते ८ लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.
‘जम्बो रेड’ जातीचे बेणे केले उपलब्ध
सोपान भोरे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, ते जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्याच्या भातोडी येथील रहिवाशी आहेत. सोपान यांनी आपले मित्र नारायण जगदाळे व गणेश मोरे यांना सोबत घेऊन ड्रॅगन फळाची शेती करण्याचा निर्धार केला. मागील वर्षी या तीनही मित्रांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथून बेणे आणून लागवड केली. तिघांनीही आपापल्या शेतीमध्ये प्रत्येकी दोन एकर शेतीमध्ये ‘जम्बो रेड’ या जातीच्या ड्रॅगन फळाची लागवड केली आहे.
(फोटो सौजन्य : istock)
किती मिळणार उत्पादन?
ड्रॅगन शेतीचा हा प्रयोग तीनही मित्रांसाठी नवीन होता. मात्र, प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर या तीनही मित्रांनी यू-ट्यूबवर ड्रॅगन फ्रूट लागवडीबाबत अधिक माहिती मिळवली. ज्यामुळे त्यांना ड्रॅगन फ्रुट लागवडीदरम्यान अधिक अडचणींचा सामना करावा लागला नाही. असे ते सांगतात. विशेष म्हणजे या तीनही तरुणांच्या शेतीमध्ये ड्रॅगन फळाची शेती एक वर्षानंतर चांगली बहरली आहे. पहिल्या वर्षीच या शेतीतून प्रत्येकाला एकरी पाच टन उत्पादन मिळेल, असा अंदाज आहे.
किती मिळाले एकरी उत्पन्न?
ड्रॅगन फळाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. तर बाजारात ड्रॅगन फ्रुटची उपलब्धता देखील कमी असते. ज्यामुळे त्यास दर देखील अधिकचा मिळतो. परिणामी, आता या तीनही मित्रांना सध्याच्या बाजारभावानुसार ड्रॅगन फळाच्या शेतीतून एकरी ७ ते ८ लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. ज्यामुळे आता या तरुण शेतकऱ्यांच्या यशामुळे आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांना मोठी प्रेरणा मिळणार आहे.