तीन महिन्यांत येणार हे 60000 कोटींचे आयपीओ; गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची मोठी संधी!
तीन महिन्यांत शेअर बाजारात तब्बल 60000 कोटींचे आयपीओ शेअर बाजारात दाखल होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ह्युंदाई मोटर इंडिया, स्विगी, एनटीपीसी ग्रीन एनर्जी आदी तगड्या कंपन्यांच्या आयपीओचा समावेश असणार आहे. हे आयपीओ साधारणपणे एकुण 60 हजार कोटी रुपयांचे असणार आहेत. दरम्यान, अलिकडेच बजाज हाऊसिंग फायनान्स, ओला इलेक्ट्रिक, पु. ना. गाडगीळ यांसारख्या आयपीओंनी तर आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न्स दिले आहेत. त्यामुळे आता येत्या काळात हे आयपीओ देखील गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
या दिग्गज कंपन्यांचीही एन्ट्री होणार
स्टॉक मार्केटवर लवकरच काही दिग्गज कंपन्या सूचिबद्ध होणार आहेत. त्याआधी या कंपन्या आपले आयपीओ घेऊन येणार आहेत. यामध्ये एफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चर, वारी एनर्जीस, निवा बूपा हेल्थ इन्शुरन्स, मोबीक्विक आणि गरुड कंस्ट्रक्शन आदी दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टननुसार डिसेंबर महिन्यापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील जवळपास 30 आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत.
एलआयसीचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता
भविष्यात येणाऱ्या आयपीओंपैकी ह्युंदाई मोटर इंडियाचा आयपीओ सर्वांत मोठा असणार आहे. ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून जवळपास 25 हजार कोटी रुपये उभे करणार आहे. त्यामुळेच हा आयपीओ आतापर्यंतचा देशातील सर्वांत मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे. याआधी एलआयसीने आयपीओच्या माध्यमातून जवळपास 21 हजार कोटी रुपये उभारले होते. ह्यूंदाईचा हा आयपीओ ऑफर फॉर सेल असणार आहे. दुसरीकडे स्विगीच्या आयपीओकडेही सर्वांचे लक्ष आहे. हा आयपीओ एकूण 10 हजार कोटी रुपयांचा असणार आहे.
64 हजार कोटी रुपये जमा
आगामी काळात एनटीपीसी ग्रीन एनर्जी या कंपनीचाही आयपीओ येणार आहे. ही कंपनी आयपीओच्या मदतीने साधारण 10 हजार कोटी रुपये जमवणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा आयपीओ नोव्हेंबर महिन्यात येणार आहे. शपूरजी पलोनजी ग्रुपचा एफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चर हा आयपीओ साधारण 7000 कोटी रुपयांचा आहे. तर वारी एनर्जीज हा आयपीओ 3000 कोटी रुपयांचा असेल.
निवा भुपा हेल्थ इन्सुरन्स हा आयपीओ 3000 कोटी रुपये तर मोबीक्विक हा आयपीओ 700 कोटी रुपयांचा असेल. या वर्षी आतापर्यंत 62 कंपन्यांनी 64,000 कोटी रुपयांचे आयपीओ आणले आहेत. 2023 या साली एकूण 57 कंपन्यांनी 49,436 कोटी रुपये उभे केले होते. 2025 साली हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. असे शेअर बाजारातील जाणकारांकडून सांगितले जात आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)