ड्राय क्लीनर कंपनीकडून साडी फाटली, महिलेला मिळाली तब्बल 45 हजारांची भरपाई!
बेंगळुरूमधील एका महिलेने आपली बनारसी साडी धुण्यासाठी आणि ईस्त्री करण्यासाठी एका धोबी कंपनीला दिली होती. मात्र, त्या कंपनीने ज्यावेळी त्यांना ही साडी पुन्हा वापस केली. त्यावेळी ती फाटलेली निघाली. त्यानंतर संबंधित महिलेने ग्राहक न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालयाने ड्राय क्लीनर कंपनीने त्या फाटलेल्या साडीच्या बदल्यात ४५ हजार रुपये भरपाई संबंधित महिलेला द्यावी, असे आदेश दिले. यामध्ये महिलेचा साडीचा खर्च, तिला झालेला मानसिक त्रास आणि न्यायालयीन खटल्याचा खर्च अशी तरतूद करत, आदेश देण्यात आला. हा निर्णय ड्राय क्लीनर्ससाठी एक मोठा धडा मानला जात आहे.
मिळाली 45,000 रुपये नुकसान भरपाई
भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूमध्ये ग्राहकांच्या बाजूने हा न्यायालयाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ड्राय क्लीनरच्या निष्काळजीपणामुळे शहरातील एका महिलेला मोठे नुकसान सहन करावे लागले. तिची 33 हजार रुपये किमतीची महागडी बनारसी साडी धुताना आणि इस्त्री करताना फाटली. त्यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेत 45,000 रुपयांची भरपाई मिळवली. यात खटल्याचा खर्च, मानसिक त्रासाची भरपाई आणि नुकसानभरपाईवरील व्याज यांचाही समावेश आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
काय आहे संपुर्ण प्रकरण
डिसेंबर २०२२ ची गोष्ट आहे. चेल्चेनाहल्ली, बेंगळुरू येथील रहिवासी असलेल्या अनुप्रभा भट्ट यांनी जयनगरमधील बँड बॉक्स आउटलेटमध्ये ड्राय क्लीनिंग आणि इस्त्रीसाठी तीन साड्या दिल्या होत्या. यामध्ये 33,000 रुपयांच्या नवीन बनारसी साडीचा समावेश होता, जी त्यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी दिल्लीहून विकत घेतली होती. कंपनीला त्यांनी ड्राय क्लीनिंगच्या बदल्यात 1,770 रुपये बिलही दिले होते. पण 12 डिसेंबरला अनुप्रभा भट्ट यांनी त्यांची साडी पुन्हा वापस घेतली. तेव्हा त्यांची बनारसी साडी पूर्णपणे फाटली होती.
किरकोळ गुंतवणूकदारांना अल्गो ट्रेडिंगमध्ये सहभागी होता येणार; सेबीचा प्रस्ताव
कंपनीकडे केली तक्रार
या घटनेची तक्रार अनुप्रभा भट्ट यांनी कंपनीकडे केली. मात्र कंपनीने त्यांचे ऐकले नाही. त्याऐवजी कंपनीने त्यांना दुसरे बिल दिले. जेव्हा अनुप्रभा भट्ट यांनी साडीची किंमत परत मागितली. तेव्हा कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने तिला जानेवारी 2023 पर्यंत पैसे मिळतील असे आश्वासन दिले होते. पण असे झाले नाही. अनुप्रभा भट्ट यांनी अनेक वेळा आउटलेटला भेट दिली, असंख्य ईमेल आणि फोन कॉल्स केले, पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी 6 डिसेंबर 2023 रोजी बँड बॉक्सला कायदेशीर नोटीसही देखील पाठवली, परंतु कंपनीने प्रतिसाद दिला नाही.
ठोठावला न्यायालयाचा दरवाजा
निराश होऊन, अनुप्रभा भट्ट यांनी 26 डिसेंबर 2023 रोजी जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे संपर्क साधला. बँड बॉक्समधील कर्मचारी अकुशल असल्याचा आरोप त्यांनी केला. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तिची मौल्यवान साडी फाटली. बँड बॉक्सच्या प्रतिनिधीने हे आरोप फेटाळले. त्यांनी सांगितले की, साड्या दाबण्याचे काम ऑटोमॅटिक मशीनमध्ये होते. त्यामुळे सदोष यंत्रणा आणि अकुशल कर्मचाऱ्यांचा प्रश्नच उद्भवत नाही. ही साडी नवीन नव्हती, तिचा दर्जा खराब होता, त्यामुळे ती फाटली, असा दावाही कंपनीने केला.
न्यायालयाने काय मान्य केले?
दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून आणि सर्व कागदपत्रांचा आढावा घेतल्यानंतर आयोगाला फाटलेली साडी दुरुस्त करता येत नसल्याचे आढळून आले. ड्राय क्लीनिंग कंपनीने कोर्टात ही साडी बनारसी असल्याचे मान्य केले. साडी तपासल्यावर ती महागडी साडी असल्याचे स्पष्ट झाले. प्रत्यक्षदर्शी साडीचे झालेले नुकसान हे सिद्ध करते होते की, कंपनीने निष्काळजीपणा केलेला होता.
किती मिळाली नुकसान भरपाई?
अनुप्रभा भट्ट या साडी खरेदीची पावती देऊ शकल्या नाहीत, असेही आयोगाने नमूद केले. त्यामुळे आयोगाने बँड बॉक्सला साडीची अंदाजे किंमत म्हणून २५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले. खटल्याच्या नोंदणीच्या तारखेपासून या रकमेवर 6 टक्के वार्षिक व्याज देखील भरावे लागेल. याशिवाय, कंपनीच्या सेवेतील कमतरता आणि एक वर्षापेक्षा जास्त काळ प्रलंबित असलेल्या खटल्यामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावासाठी 15,000 रुपये आणि न्यायालयीन खर्च म्हणून 5,000 रुपये देण्याचे आदेशही कंपनीला देण्यात आले. अशाप्रकारे अनुप्रभा भट्ट यांना एकूण 45,000 रुपयांची भरपाई मिळाली.