अफगाणिस्तानकडून कॅनडा पराभूत(फोटो-सोशल मीडिया)
T20 World Cup 2026, Afghanistan vs Canada : आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ च्या दिवसाचा तिसरा सामना १९ फेब्रुवारी रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर अफगाणिस्तान आणि कॅनडा यांच्यात खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानने शानदार कामगिरी करत कॅनडावर ८२ धावांनी एकतर्फी विजय मिळवला आणि स्पर्धेचा शेवट गोड केला.
हेही वाचा : प्रचंड फॉर्ममध्ये Zimbabwe, सुपर 8 पूर्वी अजून एक उलटफेर, ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंकेलाही नमवले
कॅनडाचा कर्णधार दिलप्रीत बाजवाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर अफगाणिस्तानला फलंदाजीसाथी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने निर्धारित २० षटकांत ४ गडी गमावून २०० धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर इब्राहिम झद्रानने संघासाठी शानदार खेळी साकारली. त्याने ५६ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ९५ धावा फटकावल्या, त्याला शतक पूर्ण करता आले नाही. तर सदीकुल्लाह अटलने ४४ धावांचे योगदान दिले, तर रहमानकुल्लाह गुरबाजने ३० धावा फटकवल्या. कॅनडाकडून जसकरण सिंगने ३ बळी घेतले. डिलन हेलिगरने एक विकेट घेतली.
२०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कॅनडाची सुरुवात खूप वाईट झाली. संघाने २५ धावांवर आपली पहिली विकेट गमावली. कर्णधार दिलप्रीत बाजवा १३ धावांवर माघारी गेला. विकेट पडत राहिल्या आणि धावसंख्या ४८ धावांवर पोहोचेपर्यंत निम्मा संघ माघारी गेलेला होता. साद बिन जफरने थोडा प्रतिकार केला, त्याने २८ धावा करून संघाला १०० धावांच्या पुढे नेले, परंतु विजयाच्या खूप दूर राहावे लागले. कॅनडाला २० षटकांत ८ बाद ११८ धावाच करता आल्या. परिणामी अफगाणिस्तान संघाने 82 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानसाठी मोहम्मद नबीने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत फक्त ७ धावा देत चार विकेट चटकावल्या. कर्णधार रशीद खानने दोन विकेट घेतल्या, तर मुजीब उर रहमान आणि अझमतुल्लाह उमरझाई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा : T20 World Cup 2026: सेमी फायनलमध्ये पुन्हा होणार भारत – पाकिस्तान टक्कर, कसे आहे गणित?






