शापूरजी पल्लनजी उद्योग समुहात अभियांत्रिकी व बांधकाम क्षेत्रातील धुरावाहक कंपनी असलेली ॲफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या आयपीओची शेअर विक्री आजपासून (ता.25) आयपीओच्या सुरु झाली आहे. त्यासाठी कंपनीने प्रत्येकी 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअरसाठी 440 रुपये ते 463 रुपये दरम्यान प्राईस बँड निश्चित केला आहे.
किती रक्कम उभारली जाणार
कंपनीची इनिशिअल पब्लिक ऑफरींग (आयपीओ) आज (ता.२५) गुंतवणुकीसाठी खुला झाला. जो मंगळवारी (ता.29) बंद होईल. इच्छुक गुंतवणूकदार किमान 32 शेअरसाठी व त्यापुढे 32 च्या पटीत शेअरसाठी बिड करु शकतील. कंपनीच्या अर्हताप्राप्त कर्मचाऱ्यांना कर्मचारी राखीव हिश्यातून प्रत्येक समभागावर 44 रुपये सवलतीच्या दराने समभाग दिले जातील. कंपनीच्या आयपीओमध्ये 1250 रुपये कोटींचा फ्रेश इश्यू व ऑफर ऑफ सेलच्या 4180 रुपये कोटी भांडवलाचा समावेश आहे.
कुठे वापरली जाणार ‘ही’ रक्कम
आयपीओ मधून उभे होणाऱ्या भांडवलापैकी 80 कोटी रुपये बांधकाम उपकरणे खरेदीसाठी वापरण्यात येणार आहेत. तसेच 320 कोटी रुपये दीर्घकालीन खेळत्या भांडवलासाठी वापरण्यात येणार आहेत. तर 600 कोटी रुपये कंपनीच्या काही कर्जाचा भाग फेडण्यासाठी व सामान्य कॉर्पोरेट हेतुंसाठी वापरण्यात येणार आहेत.
हे देखील वाचा – RBI कडून 13 फॉरेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर मोठी कारवाई ! मोठे कारण आले समोर
काय आहे कंपनीचा इतिहास
ॲफकॉन्स इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी भारतातील तब्बल साठ वर्षांचा गौरवशाली इतिहास असलेला उद्योग समूह आहे. कंपनीने देशविदेशातील अत्यंत क्लीस्ट व आव्हानात्मक इंजिनिअरींग, प्रॉक्युरमेंट, व कंस्ट्रक्शन (इपीसी) प्रकल्प लिलया पूर्ण केले आहेत. फीच अहवालानुसार ॲफकॉनला भारतातील अग्रणी आंतरराष्ट्रीय इंफ्रास्ट्रक्चर कंपनीचा मान देण्यात आला आहे. तसेच इंजिनिअरींग न्यूज रेकॉर्ड (इएनआर) नुसार 2023 आर्थिक वर्षात कंपनीच्या आंतराष्ट्रीय महसूलावरुन हा कंपनीला हा बहुमान देण्यात आला आहे.
काय काम करते ही कंपनी
ॲफकॉन्स पायाभूत म्हणजे इंफ्रास्ट्रक्चर व्यवसायातील पाच प्रमुख क्षेत्रात कार्यरत आहे. यामध्ये प्रामुख्याने सागरी व औद्योगिक क्षेत्रात बंदरविकास, ड्राय डॉक्स, एलएनजी टँक्स व मटेरिअल हँडलिंग सिस्टिम्स, भूपृष्ठ वाहतूक क्षेत्रात हायवे, इंटरचेंजेस, खाण उद्योग व रेल्वे, नागरी पायाभूत सुविधा क्षेत्रात मेट्रो, सेतू उभारणी, उड्डाणपूल, व एलिव्हेटेड कॉरिडॉर्स उभारणी, जल व भूयारी क्षेत्रात धरण, बोगदे, आणि जलप्रकल्प उभारणी, तेल व वायू क्षेत्रात ऑफशोअर व ऑनशोअर प्रकल्प अशा विविध क्षेत्रात कंपनी कार्यरत आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)