फोटो सौजन्य - Social Media
रतन टाटा यांना त्यांच्या ८७व्या वाढदिवसानिमित्त हृदयस्पर्शी मानवंदना देत जेनेरिक आधारचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी २२ वर्षीय प्रतिभावान अर्जुन देशपांडे यांनी ८७ रूग्णांना मोफत कर्करोगावरील उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचे वाटप करत या विशेष प्रसंगाला साजरे केले. हा उपक्रम रतन टाटा यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे. त्यांची शेवटची अशी इच्छा होती कि आर्थिक पार्श्वभूमीकडे न पाहता सर्वांसाठी कर्करोगावरील उपचारासाठी लागणारी औषधे परवडणारी व उपलब्ध होण्याजोगी करणे. रतन टाटा यांचा विश्वास होता की कर्करोगावरील उपचारासाठी लागणारी औषधे फक्त श्रीमतांसाठी लक्झरी नसावी, तर मुलभूत गरज असली पाहिजे, जी समाजातील विभिन्न स्तरांमधील सर्व व्यक्तींसाठी उपलब्ध असली पाहिजे. या दृष्टिकोनाला उजाळा देत अर्जुन देशपांडे यांनी या स्वप्नाला वास्तविकतेत आणण्याप्रती त्यांची कटिबद्धता सांगितली.
जेनेरिक आधारचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन देशपांडे म्हणाले, ”सर रतन टाटा यांच्या अखेरच्या इच्छेला प्रत्यक्षात आणत आणि त्यांनी प्रेरित केलेल्या कटिबद्धतेचा सन्मान करत जेनेरिक आधार भारतातील आरोग्यसेवा उपलब्धतेमध्ये बदल घडवून आणण्याप्रती समर्पित आहे. त्यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन माझ्या प्रवासामधील मोठे भाग्य आहे. त्यांच्या ८७व्या वाढदिवसानिमित्त ८७ रूग्णांना मोफत कर्करोगावरील उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचे वाटप करणे हा त्यांच्या वारसाला आमची मानवंदना आहे, ज्यामधून सर्वांसाठी परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.”
या टप्प्यामधून भारतातील आरोग्यसेवा क्षेत्रात लक्षणीय बदल घडवून आणण्यासाठी अर्जुन देशपांडे यांची अविरत समर्पितता स्पष्टपणे दिसून येते. गरजूंना मोफत जीवनदायी औषधे देऊन त्यांनी केवळ गरजूंना मदत केली नाही, तर समाजात एक सशक्त संदेश दिला आहे. त्यांच्या या कार्यामधून त्यांनी आदरणीय श्री. रतन टाटा यांना मानवंदना वाहिली आहे आणि एक समाजाभिमुख उद्योजक म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे व्यवसायाला केवळ नफा मिळवण्याचे साधन न समजता, तो समाजभल्यासाठी एक प्रभावी स्रोत बनू शकतो हे सिद्ध झाले आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून अर्जुन देशपांडे आणि त्यांच्या कंपनी जेनेरिक आधार यांनी आरोग्यसेवा ही केवळ काही लोकांचा विशेषाधिकार नसून ती प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असावा, या उद्दिष्टाला अधिक दृढता दिली आहे. गरजूंना स्वस्त दरात गुणवत्तापूर्ण औषधे उपलब्ध करून देण्याचे त्यांचे ध्येय समाजातील वंचित वर्गाला नवजीवन देण्याचे प्रतीक ठरले आहे. त्यांच्या या मोहिमेने आरोग्यसेवेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत केली असून, हे फक्त औषधांचे वाटप नसून एक व्यापक सामाजिक चळवळ बनले आहे. हा उपक्रम केवळ आशेचा किरण ठरत नाही, तर दीर्घकालीन सामाजिक प्रभाव निर्माण करण्यासाठी नाविन्यता, सहानुभूती आणि उदार मानसिकतेची आठवण करून देतो. अर्जुन देशपांडे यांच्या या प्रयत्नांनी समाजातील आरोग्यसेवेच्या क्षेत्रात एक नवीन दिशा दाखवली असून, भविष्यातील सामाजिक उद्योजकांसाठी प्रेरणादायी उदाहरण प्रस्थापित केले आहे.