आता 'हा' उद्योगपती बनवणार फिल्मे... करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची केली 1000 कोटींमध्ये खरेदी!
कोरोना काळात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने व्हॅक्सीनची निर्मिती करत जगभरात आपली ओळख निर्माण केली. आता याच सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या धर्मा प्रॉडक्शन कंपनीतील आपला निम्मा हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा खरेदी करार उद्योगपती आदर पूनावाला यांनी करण जोहरसोबत केला आहे. त्यामुळे आता भारतीय मनोरंजन उद्योगातील आतापर्यंतची सर्वात मोठी डील म्हणून याकडे पाहिले जात आहे.
मनोरंजन उद्योगातील आतापर्यंतची सर्वात मोठी डील
धर्मा प्रॉडक्शन कंपनीमधील निम्म्या हिश्श्याची रक्कम म्हणून हा व्यवहार 1000 कोटी रुपयांमध्ये करण्यात आला आहे. भारतीय मनोरंजन उद्योगातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या डीलमध्ये या डीलचा समावेश होणार आहे. ‘कुछ कुछ होता है’ ते ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘माय नेम इज खान’ सारखे हिट चित्रपट देणाऱ्या करण जोहरने ज्येष्ठ भारतीय उद्योगपती आदर पूनावाला यांच्याशी हा करार केला आहे.
हे देखील वाचा – एकच दिवसात देशभरात 22 हजार कोटींची उलाढाल; करवा चौथच्या उत्सवामुळे विक्रेते मालामाल!
50 टक्के स्टेकची 1,000 कोटीत खरेदी
उपलब्ध माहितीनुसार, अदार पूनावाला यांचे सेरेन प्रॉडक्शन हे करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन आणि धर्माटिक एंटरटेनमेंटमधील 50 टक्के स्टेक 1,000 कोटी रुपयांना विकत घेणार आहेत. या करारामध्ये, चित्रपट आणि दूरदर्शन निर्मिती आणि वितरण कंपनी धर्मा प्रॉडक्शनचे मूल्यांकन अंदाजे 2000 कोटी रुपये आहे. करार पूर्ण झाल्यानंतर, उत्पादन कंपनीतील उर्वरित अर्धा हिस्सा धर्मा प्रॉडक्शनकडे राहील आणि करण जोहर कार्यकारी अध्यक्ष राहतील. असेही त्यात ठरले असल्याचे सांगितले जात आहे.
काय म्हणाले व्हॅक्सीन किंग या करारावर?
अदार पूनावाला यांनी आर्थिक सेवा, रिअल इस्टेट ते हॉस्पिटॅलिटी यासारख्या क्षेत्रांमध्ये आपला व्यवसाय वाढवला आहे. तर आता या नवीन कराराबद्दल त्यांनी म्हटले आहे की, मी माझा मित्र करण जोहरसह आपल्या देशातील सर्वात प्रतिष्ठित प्रॉडक्शन हाऊसशी हातमिळवणी करत आहे. एकत्रितपणे, आम्ही धर्माला पुढे नेण्याची आणि अधिक उंचीला स्पर्श करण्याची अपेक्षा ठेऊन असल्याचे त्यांनी सांगितले आहे.