कितीये देवेंद्र फडणवीस यांची एकूण संपत्ती; जे घेणार आहे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ!
महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर अनेक दिवसांपासून सुरू असलेला मुख्यमंत्री (महाराष्ट्राचे मुख्यमंत्री) पदाबाबतचा सस्पेंस अखेर संपला आहे. बुधवारी (ता.४) मुंबईत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. म्हणजेच फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होतील. उद्या ५ डिसेंबरला ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. ज्याचा खुलासा त्यांनी स्वत: निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाकडे केला होता. याच पार्श्वभुमीवर आज आपण त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत…
13 कोटींची निव्वळ संपत्ती
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या त्यांच्या मालमत्तेच्या तपशीलानुसार, त्यांची एकूण संपत्ती (देवेंद्र फडणवीस नेट वर्थ) 13.27 कोटी रुपये इतकी आहे. तर त्यांच्यावर एकूण 62 लाख रुपयांची उसणवारी देखील आहे. MyNeta.com वरील निवडणूक प्रतिज्ञापत्राचा हवाला देत, असे सांगण्यात आले आहे की, 2023-24 या वर्षात देवेंद्र फडणवीस यांचे एकूण उत्पन्न 79.3 लाख रुपये होते. तर त्याआधीचे वर्ष सुमारे 92.48 लाख रुपये इतके होते.
बँकिंग क्षेत्रासंदर्भात मोठी बातमी! आता बँक खात्याला 4 नॉमिनी जोडता येणार; लोकसभेत विधेयक मंजूर
पत्नीने गुंतवलेत करोडो रुपये शेअर्स, बाँडमध्ये
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा आहे. याशिवाय महाराष्ट्राचे होणारे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेअर बाजार, बॉण्ड्स किंवा डिबेंचरमध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाही. परंतु पत्नी अमृता फडणवीस यांची बाँड, शेअर्स आणि म्युच्युअल फंडांमध्ये सुमारे 5.63 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. याशिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या एनएसएस-पोस्टल सेव्हिंग खात्यात १७ लाख रुपये जमा आहेत. तर त्यांच्याकडे ३ लाख रुपयांची एलआयसी पॉलिसी देखील आहे.
लाखोंचे दागिने, पण गाडी नाही
जंगम मालमत्तेचे इतर तपशील पाहिल्यास, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुमारे 450 ग्रॅम सोने आहे. आणि त्यांच्या पत्नीकडे 900 ग्रॅम सोने आहे. त्याची किंमत सुमारे 98 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्राचे होणारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावावर एकही गाडी नाही. तसेच त्यांच्या पत्नीकडे देखील कोणतीही चारचाकी गाडी नाही. याउलट फडणवीस यांच्यावर त्यांच्या पत्नीने घेतलेल्या 62 लाखांच्या कर्जाची जबाबदारी आहे.
गुंतवणूकदारांना व्याजासहित मिळणार पैसे; सेबीचा ‘या’ कंपनीविरोधात ऐतिहासिक निर्णय!
फडणवीस राहतात 3 कोटींच्या घरात
आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या स्थावर मालमत्तेबद्दल जाणून घेऊया. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावावर १.२७ कोटी रुपयांची शेतजमीन आहे. निवासी मालमत्तेवर नजर टाकली तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर ३ कोटी रुपयांचे घर आणि ४७ लाख रुपयांचे अन्य दुसरे घर देखील आहे. याशिवाय त्यांच्या पत्नीच्या नावावर ३६ लाख रुपयांची निवासी मालमत्ताही आहे.