गुंतवणूकदारांना व्याजासहित मिळणार पैसे; सेबीचा 'या' कंपनीविरोधात ऐतिहासिक निर्णय!
शेअर बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील कंपनी ट्रॅफिकसोल आयटीएस टेक्नॉलॉजीजबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सेबीने कंपनीला गुंतवणूकदारांचे पैसे परत करावे लागतील असे आदेश दिले आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्या गुंतवणूकदारांना या कंपनीचा आयपीओ वाटप करण्यात आला होता त्यांना कंपनी व्याजासह पैसे परत करेल. अशी तंबीही सेबीने संबंधित कंपनीला दिली आहे.
इतक्या दिवसात पैसे परत करावे लागणार
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) आदेश देताना सांगितले आहे की, ट्रॅफिकसोल आयटीएस टेक्नॉलॉजीजला त्यांच्या गुंतवणूकदारांचे पैसे 1 आठवड्याच्या आत परत करावे लागतील. यासाठी सेबीने परताव्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि मर्चंट बँकर्सवर सोपवली आहे. सेबीने आदेशात म्हटले आहे की, रक्कम काढण्याबरोबरच डिपॉझिटरीला शेअर्स वेगळ्या डिमॅट खात्यात हस्तांतरित करावे लागणार आहे. यानंतर, कंपनी विहित प्रक्रियेनुसार गुंतवणूकदारांना जारी केलेले शेअर्स रद्द करेल. असेही सांगण्यात आले आहे.
(फोटो सौजन्य – istock)
आयटीसी लिमिटेडचा शेअर 4.65 टक्क्यांनी घसरला; तंबाखूजन्य उत्पादनांवरील जीएसटी वाढण्याचा परिणाम!
सेबीने का घेतलाय हा निर्णय?
खरे तर, ऑक्टोबर 2024 मध्ये सेबीने बीएसईला कंपनीचे लिस्टिंग थांबवण्याचे निर्देश देण्यात आले होते. कारण सेबी ट्रॅफिकसोल आयटीएस टेक्नॉलॉजीजने दाखल केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या मसुद्यात केलेल्या खुलाशांची तपशीलवार तपासणी करत होती.
या दिवशी आयपीओची होणार होती लिस्टिंग
ट्रॅफिकसोल आयटीएस टेक्नॉलॉजीजची सूची बीएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर १७ सप्टेंबर रोजी होणार होती. परंतु, सेबीने या यादीवर बंदी घातली होती. विशेष म्हणजे हा आयपीओ उघडल्यानंतर 345 वेळा सबस्क्राइब झाला होता. 10 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान सुरू झालेल्या या आयपीओमध्ये 64 लाख नवीन शेअर्स जारी करण्यात आले आहे.
ओला इलेक्ट्रिक शेअरमध्ये 16 टक्क्यांहून अधिक वाढ; कंपनी देशभर उभारणार नवीन स्टोअर्स!
आरोपांवर कंपनीने काय म्हटलंय?
ऑक्टोबरमध्ये जेव्हा सेबीने कंपनीवर आरोप केले होते. तेव्हा कंपनीने आरोपांना उत्तर म्हणून एक निवेदन जारी केले होते की, कंपनीने सेबी आणि मुंबई शेअर बाजाराला सुचित केले आहे. ज्यात त्यांनी आपल्या डीआरएचपीमध्ये नमूद केलेली सॉफ्टवेअर खरेदी योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ट्रॅफिकसोलने बीएसईला पुढे सांगितले आहे की, ते विक्रेत्यांकडून नवीन प्रस्ताव मागतील आणि भागधारकांच्या मंजुरीनंतरच करार केला जाईल.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)