(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘द केरळ स्टोरी २’ २७ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी, अफवा पसरल्या होत्या की निर्मात्यांनी या वादग्रस्त चित्रपटाचा टीझर हटवला आहे. परंतु, निर्मात्यांनी आता स्पष्ट केले आहे की त्यांच्या आगामी चित्रपटाचा टीझर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून डिलीट करण्यात नाही आला आहे. मंगळवारी, सनशाइन पिक्चर्सने एक अधिकृत निवेदन जारी केले, ज्यामध्ये असे सर्व वृत्त “खोटे आणि निराधार” असल्याचे म्हटले आहे. तसेच चित्रपटाचा हा टीझर चांगलाच चर्चेत आला आहे.
‘द केरळ स्टोरी २’ चा टीझर केला डिलीट?
अधिकृत निवेदनात निर्मात्यांनी म्हटले की, “सनशाइन पिक्चर्स स्पष्ट करू इच्छिते की ‘द केरला स्टोरी 2 – गोज बियॉन्ड’चा टीझर हटवण्यात आल्याच्या सध्या सुरू असलेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या, निराधार आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत. हा विषय सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. कोणत्याही न्यायालयाने कोणतेही कंटेंट हटवण्याचा कोणताही आदेश किंवा निर्णय दिलेला नाही. आम्ही कोणतेही साहित्य डिलीट किंवा काढून टाकलेले नाही.”
‘सुपर डुपर’ प्रेक्षकांच्या मनावर होणार कब्जा! चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
पुढे निवेदनात म्हटले आहे, “‘द केरला स्टोरी 2 – गोज बियॉन्ड’चा टीझर आणि ट्रेलर दोन्ही आमच्या सर्व अधिकृत प्लॅटफॉर्मवर उपलब्ध राहतील. आम्ही माध्यमसंस्था, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि जनतेला आवाहन करतो की पडताळणी न केलेली माहिती किंवा तर्काधारित बातम्या प्रसारित करू नयेत. अशा चुकीच्या माहितीतून केवळ अनावश्यक गोंधळ निर्माण होतो.”
‘द केरळ स्टोरी २’ टीझर रिलीज झाल्यापासून वादात
टीझर प्रदर्शित झाल्यापासून ‘द केरला स्टोरी 2’ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाच्या विरोधात याचिका (PIL) दाखल करण्यात आली असून, या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे सांप्रदायिक भावना दुखावू शकतात असा दावा करण्यात आला आहे. सध्या हा विषय न्यायालयात सुरु आहे. दरम्यान, चित्रपटाचे निर्माता विपुल अमृतलाल शाह यांनी चित्रपटाला होत असलेल्या विरोधावर प्रतिक्रिया दिली आहे.
एनडीटीव्हीशी संवाद साधताना शाह म्हणाले, “आम्ही केरळच्या विरोधात नाही. केरळ हे देवभूमी आहे… आम्हाला फक्त त्या राज्यातील ही वाईट प्रवृत्ती लवकरात लवकर संपावी असे वाटते.” त्यांनी पुढे सांगितले, “पहिल्या चित्रपटावर काही लोकांनी टीका केली होती की ३२,००० हा आकडा खोटा आहे. याबाबत आम्ही यूट्यूबवर एक व्हिडिओ तयार केला असून तो सध्या उपलब्ध आहे. आम्ही त्यात नावे आणि आकडेही दाखवले आहेत. सरकारकडे आमच्यापेक्षा अधिक माहिती असू शकते, मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कोणतीही कठोर कारवाई झाल्याचे आम्ही ऐकलेले नाही.” दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनीही अलीकडेच या चित्रपटावर टीका केली होती.






