E-20 नंतर आता डिझेलमध्येही इथेनॉल ब्लेंडिंग ( सौजन्य - सोशल मीडिया )
द इंडिया शुगर अँड बायो-एनर्जी कॉन्फरन्स २०२६’ च्या चौथ्या आवृत्तीला व्हर्च्युअली संबोधित करताना कपूर यांनी हे स्पष्ट केलं की, E 20 प्रोग्राम आतापर्यंत “अत्यंत यशस्वी” ठरला आहे आणि अनेक वाहन उत्पादकांनी लवकरच फ्लेक्सी-फ्यूएल वाहने सादर करण्याची योजना जाहीर करण्यात येणार आहे.
E 20 चा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता पुढे प्लॅन काय याबाबत बोलताना तरुण कपूर यांनी स्पष्ट केलं की, “आता पुढचं लक्ष फ्लेक्सी-फ्यूएल वाहनांवर आणि E 20 पेक्षा जास्त मिश्रणाला परवानगी देण्यावर आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, अशी वाहने उपलब्ध करून देण्यासाठी इंधन केंद्रांवर शुद्ध इथेनॉलची उपलब्धता वाढवणे देखील आवश्यक असेल. कपूर यांनी पुढे सांगितले की, पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर जैवइंधनावर भर देणे अधिकच गरजेचं झाले आहे. या संकटामुळे पुरवठा विस्कळीत झाला आहे आणि कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल जवळपास १०० डॉलरपर्यंत पोहोचल्या आहे त्यामुळे पुढचं पाऊल फार महत्त्वाचं आहे.
देशात जे काही उपलब्ध आहे त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देशाची इथेनॉल उत्पादन क्षमता पेट्रोलमध्ये मिसळण्याच्या गरजेपेक्षा जास्त झाली आहे त्यामुळे उपलब्ध असलेल्या या अतिरिक्त क्षमतेचा पूर्णपणे वापर करण्यासाठी उद्योगांनीही याचा विविध अंगाने वापर करणं गरजेचं आहे.
डिझेल विभागासंदर्भात कपूर म्हणाले की, सरकार बायोफ्युएल अॅडिटिव्ह्ज विचार करत आहे. जर आयसोब्युटेनॉलचे प्रयोग यशस्वी झाले, तर जैवइंधनासाठी एक मोठा नवीन मार्ग खुला होऊ शकतो. कारण रिफायनरी उत्पादनात डिझेलचा मोठा वाटा असतो. त्यांनी सरकारच्या नवीन ‘गोवर्धन’ योजनेचाही उल्लेख केला, जी संकुचित बायोगॅसला प्रोत्साहन देण्यासाठी विविध मंत्रालयांचे सहकार्य एकत्र आणते आहे.






