नोकरीच्या मागे न लागता धरली शेतीची वाट; करतोय वार्षिक 15 लाखांची कमाई!
राज्यात सध्या अनेक सुशिक्षित तरुण शेतीमध्ये पाऊल ठेवत आहे. विशेष म्हणजे आपल्या ज्ञान आणि बुद्धीच्या जोरावर हे तरूण शेतीमधून मोठ्या प्रमाणात उत्पादन देखील मिळवत आहे. शेतीला आधुनिक पद्धतीची जोड दिल्याने, या तरुणांना शेतीमधून मोठे यश देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका तरुण शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्याने पारंपारिक शेतीला फाटा देत, शेतीला आधुनिकतेची जोड देत कापसाच्या शेतीमधून मोठी उलाढाल केली आहे.
नोकरीच्या मागे न लागता धरली शेतीची वाट
गणेश लहाने असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते जालना जिल्ह्यातील संगमपूर येथील रहिवासी आहेत. गणेश याने बीएड झाल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता शेतीची वाट धरली. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून ते कापसाचे उत्पादन घेत आहे. त्यांनी आपल्या दहा एकर शेतीमध्ये कापूस, मका आणि कांद्याचे पीक घेत आहे. ज्यातून त्यांना वर्षाकाठी तब्बल १५ लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवत आहेत. ज्यामुळे सध्या त्याच्या यशस्वी शेतीची चांगलीच चर्चा होत आहे.
(फोटो सौजन्य – istock)
शेतकरी गणेश लहाने हे काही काळ ग्रामपंचायतीमध्ये लिपिक पदावर काम करत होते. ते पारंपारिक शेतीला सेंद्रिय शेतीची जोड देत, मोठे उत्पन्न मिळवत आहेत. त्यांनी आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय खताचा वापर, पाणी व्यवस्थापन, शेणखत वापर, गांडुळखत वापर करत शेती फुलवली आहे. सेंद्रिय शेतीमुळे शाश्वत उत्पादन मिळण्यास मदत झाली असलयाचे ते सांगतात.
जोडधंदा म्हणून करतात ‘हा’ व्यवसाय
सेंद्रिय शेती म्हटले की, त्यासाठी शेणखत आणि गोमुञांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. त्यासाठी त्यांनी गाई-म्हशींचे पालन केले आहे. इतकेच नाही तर त्यांनी आपल्या गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतच्या विहिरीतून पाणीपुरवठा योजना देखील सुरू केली आहे. त्यांच्या विहिरीला बारमाही पाणी असल्याने, ते गावातील ५० ते ६० घरांना पाणीपुरवठा करतात. त्यासाठी त्यांनी गावातील प्रत्येक घरापर्यंत पाईपलाईन केली आहे. या माध्यमातून ते वर्षाला प्रति घर ३००० रुपये आकारणी करतात.
किती मिळतंय उत्पन्न?
शेतकरी गणेश लहाने यांना सेंद्रिय शेतीच्या माध्यसातून उत्पादित होणाऱ्या कापुस, कांदा, मका या पिकांपासून वार्षिक १५ लाखांची कमाई होत आहे. याशिवाय त्यांना गावात चालवल्या जाणाऱ्या पाणी योजनेच्या माध्यमातून देखील चांगली कमाई होत असल्याचे ते सांगतात. शेतीमध्ये आपल्याला एकरी १२ ते १५ रुपयांचा खर्च येत असल्याचेही त्यांनी नमुद केले आहे.