खेडमध्ये शिंदे सेनेच्या भगवा लाटेचा धडाका(फोटो - सोशल मीडिया)
खेड : रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत खेड तालुक्यात शिंदे शिवसेनेने राजकीय वर्चस्वाचा स्पष्ट इशारा देत विरोधकांच्या गडांना सुरुंग लावला आहे. जिल्हा परिषदच्या ७ पैकी ६ गटांवर आणि पंचायत समितीच्या १४ पैकी १० गणांवर भगवा फडकावत शिंदे गटाने तालुक्यातील सत्ता-समीकरणे पूर्णतः बदलून टाकली आहेत.
पक्षफुटीनंतर प्रथमच झालेल्या या महत्त्वाच्या स्थानिक निवडणुकीत मतदारांनी स्पष्ट कौल देत शिंदे गटालाच पसंती दिल्याचे चित्र समोर आले आहे. हा निकाल म्हणजे “खरी शिवसेना कोणाची?” या राजकीय संघर्षावर मतदारांनी दिलेला ठोस शिक्कामोर्तब असल्याचे मानले जात आहे. खेडमधील हा निकाल म्हणजे केवळ स्थानिक विजय नसून, तो ठाकरे गटासाठी इशारा आणि शिंदे शिवसेनेसाठी निर्णायक टप्पा ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
ठाकरे गटाच्या प्रभावाला तडा
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला काही गटांपुरते यश मिळाले असले, तरी एकेकाळी मजबूत मानल्या जाणाऱ्या खेड तालुक्यात त्यांच्या संघटनात्मक ताकदीला मोठा धक्का बसला आहे. लोटे आणि काही पंचायत समिती गणांपुरतेच मर्यादित राहिलेले यश ठाकरे गटासाठी आत्मपरीक्षणाची घंटा ठरली आहे.
शिंदे गटाची आक्रमक रणनीती यशस्वी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेनेने विकास, प्रशासनाशी थेट संपर्क आणि स्थानिक कार्यकर्त्यांची मजबूत फळी या त्रिसूत्रीवर निवडणूक लढवली. त्याचा थेट फायदा ग्रामीण भागात दिसून आला. गावपातळीवर केलेले संघटन आणि आक्रमक प्रचारामुळे विरोधकांना सुरुवातीलाच पिछाडीवर टाकण्यात शिंदे गट यशस्वी ठरला.
राष्ट्रवादीला अपवादात्मक यश
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला भडगाव व जामगेसारख्या प्रतिष्ठेच्या ठिकाणी यश मिळाले असले, तरी एकूण राजकीय चित्रात त्यांचा प्रभाव मर्यादितच राहिला. हे यश अपवादात्मक ठरले असून, तालुकास्तरावर नेतृत्व उभे करण्यात पक्षाला अजून मोठी कसरत करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आगामी राजकारणाला दिशा
या निकालामुळे खेड तालुक्यात शिंदे शिवसेनेचा दबदबा अधिकच घट्ट झाला असून, आगामी पंचायत, नगरपालिका आणि विधानसभा निवडणुकांसाठी विरोधकांवर मानसिक दबाव निर्माण झाला आहे. स्थानिक सत्ताकेंद्रांवर नियंत्रण मिळाल्याने शिंदे गटाचे राजकीय वजन वाढणार असून, कोकणातील राजकारणात नव्या सत्तासमीकरणांची नांदी म्हणून या विजयाकडे पाहिले जात आहे.
हेदेखील वाचा : Shambhuraj Desai News: आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? महायुतीत ठिणगी, शंभूराजे देसाईंनी सुनावले खडेबोल






