खजूर, ड्रॅगन फ्रुटच्या यशस्वी मिश्र शेतीतून लाखोंचे उत्पन्न; बीडच्या महिला शेतकऱ्याची कमाल!
राज्यात मराठवाडा म्हटले दुष्काळी भाग अशी ओळख मराठवाड्याची निर्माण झाली आहे. या भागात दरवर्षीच पडणाऱ्या कमी पावसामुळे शेती उत्पादन हे अपेक्षेतप्रमाणे मिळत नाही. अशातही काही शेतकरी हे सध्या आपल्या जिद्दीच्या जोरावर विदेशी फळांसह, वैविध्यपूर्ण फळांची लागवड करत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना या फळांच्या लागवडीतून अधिकचा फायदा होत आहे. आज आपण महिला शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्या विदेशी ड्रॅगन फ्रुट आणि खजूर लागवडीतून मोठी कमाई करत आहे.
मिश्र शेतीचा अभिनव प्रयोग
विजया गंगाधर घुले असे या महिला शेतकऱ्याचे नाव असून, त्या बीड जिल्ह्यातील केलसांगवी तालुक्यातील रहिवाशी आहे. विजया यांनी खजूर लागवड, ड्रॅगन फळाची लागवड आणि सफरचंदाची लागवड असा मिश्र शेतीचा प्रयोग केला आहे. त्यांनी आपल्या एक एकर शेतीमध्ये या तिन्ही पिकांची लागवड केली आहे. सुरुवातीला २०१६ मध्ये त्यांनी अर्ध्या एकरात ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. त्यानंतर हळूहळू जमिनीचे क्षेत्र वाढवत आज एक एकरात खजूर लागवड, ड्रॅगन फळाची लागवड आणि सफरचंदाची लागवड अशी मिश्र शेती फुलवली आहे.
करतायेत बक्कळ कमाई
शेतकरी विजया गंगाधर घुले सांगतात, ड्रॅगन फळाच्या शेतीतून त्यांना वार्षिक लाखो रुपयांचे उत्पादन मिळत आहे. याशिवाय त्यांनी आपल्या त्याच जमिनीत ८० खजूर आणि २४० सफरचंदाची झाडे लावली आहेत. सध्याच्या घडीला त्यांना खजूर आणि ड्रॅगन फळाच्या माध्यमातून उत्पादन मिळत आहे. पहिल्या वर्षी त्यांना खजूराचे 70 किलो ते 120 किलो इतके उत्पादन मिळाले. ज्यास बाजारात 70 ते 100 रुपये प्रति किलो इतका दर मिळाला आहे.
८० खजूर झाडांपासून त्यांना पहिल्या वर्षी २.५० ते तीन लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले. तर ड्रॅगन फळाच्या माध्यमातूनही त्यांना काही उत्पादन मिळत आहे. अशातच आता त्यांना पुढील वर्षी खजूर लागवड, ड्रॅगन फळाची लागवड आणि सफरचंदाची लागवड असा मिश्र शेतीच्या प्रयोगातून एकत्रिपणे एक एकरातून कमीत कमी १० लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
मिळाला आहे जिजामाता पुरस्कार
शेतकरी विजया गंगाधर घुले यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत, आधुनिक पद्धतीचा अवलंब करत फळशेतीचा अंगीकार केल्याने त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे. विशेष म्हणजे शेतकरी विजया या कोणत्याही रसायनांचा आपल्या शेती किंवा पिकांवर फवारणीद्वारे वापर करत नाही. शेतकरी विजया यांच्या शेतीतील अभिनव प्रयोगासाठी त्यांना महाराष्ट्र सरकारकडून 2022-23 मध्ये जिजामाता कृषि भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.