जगातील श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचावर अमेरिकेत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अदानीसह सात जणांवर न्यूयॉर्कमधील न्यायालयात २६५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २२५० कोटी रुपये) लाचखोरी आणि फसवणुकीचे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. आरोपांनुसार, या आरोपींनी २ अब्ज डॉलर्सच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या कंत्राटांसाठी अधिकाऱ्यांना लाच दिली होती.
न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्टच्या आदेशानुसार, “2020 ते 2024 दरम्यान, एका भारतीय नवीकरणीय ऊर्जा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, जी एका भारतीय समूहाच्या पोर्टफोलियो कंपनीचा भाग असून अमेरिकन एक्सचेंजवर सूचीबद्ध होती, कॅनडाच्या एका संस्थात्मक गुंतवणूकदारासोबत भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्याचा कट रचला. या कटाचा उद्देश भारतीय सरकारी संस्थांकडून फायदेशीर सौरऊर्जा पुरवठा कंत्राटे सुनिश्चित करणे हा होता.”
आरोपांनुसार, अदानी समूहाने सरकारी अधिकाऱ्यांना मोठ्या रकमेची लाच देऊन सौरऊर्जा प्रकल्पांची कंत्राटे मिळवण्याचा प्रयत्न केला. या व्यवहारात लपवलेल्या माहितीमुळे कंपनीने गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात निधी उभा केला, जो गैरव्यवहारासाठी वापरल्याचा संशय आहे. अदानी समूहाचे हे वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन, फसवणूक आणि न्यायात अडथळा आणण्याचे आरोप ठेवण्यात आले.
यूएसमध्ये अदानी समूहाविरोधात चौकशी
अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या सरकारी वकिलांनी गौतम अदानी, त्यांचे पुतणे सागर अदानी आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत जैन यांच्यावर गुंतवणूकदारांपासून माहिती लपवल्याचा आरोप केला आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार , यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (एसईसी) हे प्रकल्प मिळवण्यासाठी लाचखोरी झाली का, याची चौकशी करत होते.
Numero Uno आणि The Big Man
अदानी ग्रीन एनर्जीचे माजी सीईओ विनीत जैन यांनी कथितपणे कर्जदार व गुंतवणूकदारांकडून माहिती लपवून कर्ज आणि बाँडद्वारे ३ अब्ज डॉलर्स जमा केले होते. तपासात असेही उघड झाले की काही षड्यंत्रकर्ते गौतम अदानी यांना सांकेतिक नावांनी जसे Numero Uno आणि The Big Man संबोधत होते. सागर अदानी यांनीही लाचखोरीचे व्यवहार ट्रॅक करण्यासाठी आपला मोबाईल फोन वापरल्याचा आरोप आहे.
अमेरिका लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन आणि न्यायात अडथळा
गौतम अदानी, सागर अदानी आणि विनीत जैन यांच्यावर सिक्युरिटीज फसवणुकीचा कट रचल्याचा तसेच फसवणुकीच्या कटाचा आरोप ठेवण्यात आला आहे. याशिवाय इतरांवर अमेरिका लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन आणि न्यायात अडथळा आणल्याचा आरोप आहे. मीडिया रिपोर्टनुसार, प्रतिवादींनी गुंतवणूकदारांना चुकीची माहिती दिली होती, ज्यामुळे कर्ज व बाँडच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उभा करण्यात आला.
या आरोपामुळे कंपनीच्या शेअर्सवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. कंपनीचे शेअर्समध्ये तब्बल 20 टक्क्याहून जास्त टक्क्यांची घसरण आतापर्यंत झालेली दिसते.