गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी; हा तगडा आयपीओ लवकरच खुला होणार, वाचा... काय आहे किंमत पट्टा!
भारतीय किरकोळ आरोग्य विमा व्यवसाय क्षेत्रात अत्यंत वेगाने विस्तारत असणारी व केवळ आरोग्य विमा (स्टँडअलोन) व्यवसाय करणारी कंपनी म्हणून नीवा बुपा हेल्थ इंश्युरन्स कंपनीची ओळख आहे. ही कंपनी येत्या गुरुवारी (ता.7) आपल्या आयपीओच्या माध्यमातून खुली समभाग विक्री सुरु करणार आहे. कंपनीने त्यासाठी प्रत्येकी 10 रुपये फेसव्हॅल्यू असलेल्या प्रत्येक समभागासाठी 70 रुपये ते 74 रुपये असा प्राईस बँड निश्चित केलेला आहे.
2024 आर्थिक वर्षात कंपनीच्या ग्रॉस डायरेक्ट प्रिमिअम इंकम अर्थात जीडीपीआयच्या आधारे ही कंपनी देशात सर्वात वेगाने व्यवसाय विस्तारणारी कंपनी ठरली आहे. नीवा बुपा कंपनीची आपली आयपीओ विक्री ऑफर गुरुवारी (ता.7) सुरु होणार असून, सोमवारी (ता.11) ही विक्री बंद होणार आहे. इच्छुक गुंतवणूकदार किमान 200 समभागांच्या लॉटसाठी व त्यापुढे 200 समभागांच्या पटीत अर्ज बीड अर्ज करु शकतील.
हे देखील वाचा – क्रिकेटचा किंग विराट कोहली कमाईतही आहे अव्वल, 1000 कोटींहून अधिक संपत्तीचा आहे मालक!
आयपीओमध्ये 800 कोटी रुपये किमतीच्या फ्रेश इश्यूचा व बुपा सिंगापूर होल्डिंग्स पीटीई लिमिटेड फेटल टोन एलएलपी कंपनीकडून 1400 कोटी रुपयांच्या ऑफर ऑफ सेलचा समावेश असणार आहे. कंपनी आपल्या या आयपीओच्या माध्यमातून मिळणाऱ्या रकमेपैकी 1500 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम भांडवली पाया मजबूत करण्यासाठी तसेच आपली पतदारिता (सॉल्व्हन्सी) पातळी वाढवण्यासाठी तसेच सर्वसाधारण कॉर्पोरेट हेतुंसाठी उपयोगात आणणार आहे.
आर्थिक वर्ष 2024 मध्ये नीवा बुपा कंपनीने एकूण 54.94 दशलक्ष रुपये ग्रॉस डायरेक्ट प्रिमिअम (जीडीपीआय) उत्पन्न मिळवले होते. त्याआधारे देशात स्टँड अलोन हेल्थ इंश्युरन्स म्हणजे केवळ आरोग्य, अपघात व प्रवास विमा देणाऱ्या कंपन्यांमध्ये तिसरी मोठी विमा कंपनी व दुसऱ्या क्रमांकाची वेगाने विस्तारणारी कंपनी ठरली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2022 ते 2024 दरम्यान वार्षिक 41.37 टक्के दराने वाढ साध्य केली असून, ही वाढ एकूण विमा उद्योगाच्या सरासरी वाढीच्या दुप्पट आहे.
कंपनीची आयपीओ ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारा करण्यात आली आहे. त्यानुसार अर्हता प्राप्त संस्थात्मक खरेदीदार (क्यूआयबी) गुंतवणूकदारांसाठी प्रमाणानुसार 75 टक्क्यांपेक्षा कमी समभाग उपलब्ध करण्यात येणार नाहीत. तसेच बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 15 टक्क्यांपेक्षा जास्त समभाग उपलब्ध केले जाणार नाहीत. तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 10 टक्क्यांपेक्षा जास्त समभाग उपलब्ध केले जाणार नाहीत.
आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, मॉर्गन स्टॅन्ले इंडिया कंपनी लिमिटेड, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, ॲक्सिस कपिटल लिमिटेड, एचडीएफसी बँक लिमिटेड व मोतीलाल ओसवाल इनव्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स लिमिटेड या कंपन्यांनी नीवा बुपा कंपनीच्या आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स म्हणून काम पाहिले आहे. तर केफिन टेक्नालॉजिज लिमिटेड कंपनीने आयपीओ रजिस्ट्रार म्हणून जबाबदारी स्विकारली आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)