सरकार पुन्हा कांदा दर पाडण्याच्या तयारीत? खरेदी केला हजारो टनांचा साठा!
केंद्र सरकारने कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. सरकारने राखीव साठ्यासाठी एकूण 71,000 टन कांदा खरेदी केला असल्याचे समोर आले आहे. सध्याच्या घडीला घाऊक बाजारात कांदा दर ४० रुपये प्रति किलोच्या वरती पोहचले आहेत. दरम्यान, ग्राहक आणि संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आज देशातील कांदा दर सरासरी 38.67 रुपये इतका राहिला आहे. सरकारला येत्या काळात कांदा दरात घसरणीची अपेक्षा आहे.
70,987 टन कांद्याची सरकारी खरेदी
केंद्र सरकार कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी सुरु करण्यात आली आहे. ज्यात सरकारने आतापर्यंत एकूण 71,000 टन कांद्याची खरेदी केली आहे. केंद्रीय ग्राहक आणि संरक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, “कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने चालू वर्षात एकूण 5 लाख टन कांद्याची सरकारी खरेदी करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. ज्यापैकी 20 जूनपर्यंत केंद्र सरकारकडून एकूण 70,987 टन कांदा सरकारी खरेदीच्या स्वरूपात खरेदी करण्यात आला आहे. मागील वर्षी याच कालावधीत केंद्र सरकारने 74,071 टन कांदा खरेदी केलेला होता.”
(फोटो सौजन्य : istock)
सरकारकडून सावध पवित्रा
दरम्यान, यावर्षी तीव्र उष्णता आणि कमी पावसामुळे उन्हाळी कांद्याच्या उत्पादनात मोठी घट नोंदवली गेली आहे. अर्थात साठवणुकीसाठी जास्त काळ टिकणाऱ्या या कांद्याचे उत्पादन घटल्याने, त्याचा थेट परिणाम आता कांदा दरावर दिसून येत आहे. अल्पावधीतच कांदा दराने ४००० रुपये प्रति क्विंटलची पातळी गाठली आहे. अशातच आता ऑक्टोबरपर्यंत नवीन कांदा बाजारात येईपर्यंत दर चढेच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्यामुळे आता सरकारने सावध पवित्रा घेत सरकारी खरेदीत वाढ करत, कांद्याच्या राखीव साठ्यात वाढ करणे सुरु केले आहे.
40 टक्के निर्यात शुल्क लागू
कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून सातत्याने पावले उचलली जात आहेत. ज्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या दोन महिने आधीपासून कांदा मोठ्या प्रमाणात घसरले होते. त्यानंतर आता ज्यात सुधारणा होण्यास सुरुवात झाली आहे. अखेर 4 मे 2024 रोजी केंद्र सरकारने 550 डॉलर प्रति टन किमान निर्यात मूल्य आणि 40 टक्के निर्यात शुल्कासह कांदा निर्यातबंदी उठवली होती. मात्र, मे महिन्यात कांदा दरात फारशी वाढ दिसून आली नव्हती.