5000 रुपयांत सुरु केला बिझनेस, आज आहे 400 कोटींच्या कंपनीचा मालक; वाचा... प्रेरणादायी यशोगाथा!
ऊर्जा क्षेत्रातील आघाडीची कंपनी वारी एनर्जीने सोमवारी (ता.२९) शेअर बाजारात प्रवेश केला आहे. कंपनीच्या शेअरला शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. यासह सोलर सेल बनवणारी वारी एनर्जीजचे अध्यक्ष आणि एमडी हितेश चिमणलाल दोशी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आले आहेत. हितेश दोशी यांनी 1985 मध्ये केवळ 5000 रुपये कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला आहे. आज हितेश दोशी आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 5.2 अब्ज डॉलर (अंदाजे 400 कोटी रुपये) इतकी आहे. हितेश दोशी यांनी त्यांच्या गावातील मंदिरावरून कंपनीचे नाव दिले आहे.
अक्षय ऊर्जा क्षेत्रातील नामवंत कंपन्यांमध्ये त्याची गणना
हितेश चिमणलाल दोशी हे जवळपास 40 वर्षांपासून वारी ग्रुपचे नेतृत्व करत आहेत. अक्षय ऊर्जा क्षेत्रातील नामवंत कंपन्यांमध्ये या कंपनीची गणना होते. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, वारी एनर्जीजची इश्यू किंमत 1503 रुपये होती. पण त्याची लिस्टिंग 997 रुपयांनी वाढून, 2500 रुपये झाली आहे. त्यामुळे दोशी कुटुंबाची एकूण संपत्ती जवळपास दुप्पट झाली आहे. हितेश दोशी यांचे दोन भाऊ आणि पुतणे कंपनीच्या संचालक मंडळावर आहेत. दोशी कुटुंब हे वारी ग्रुपच्या अभियांत्रिकी कंपनी वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज आणि वारी टेक्नॉलॉजीजचे सर्वात मोठे शेअर होल्डर आहेत. या दोन्ही कंपन्यांची लिस्टिंग आधीच झाली आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
सर्वात मोठी सोलर मॉड्युल उत्पादक कंपनी
वारी एनर्जी ही भारतातील सर्वात मोठी सौर मॉड्यूल उत्पादक कंपनी आहे. तिची क्षमता 1200 मेगावॅट आहे. तिचा बहुतांश महसूल अमेरिकेतील निर्यातीतून येतो. चीनच्या सोलर सेलवरील वाढीव शुल्काचा कंपनीला खूप फायदा झाला आहे. या वर्षी सौर साठ्यातही बरीच वाढ दिसून येत आहे. कंपनीच्या आयपीओने चांगला परतावा देऊन गुंतवणूकदारांना खूश केले आहे. कंपनी आयपीओमधून 2,800 कोटी रुपये ओडिशामध्ये 6 जीडब्लू उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी वापरणार आहे.
गावातील मंदीराच्या नावावरून ठेवले कंपनीचे नाव
हितेश चिमणलाल दोशी यांचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. मुंबईत शिकत असताना त्यांनी 1985 मध्ये 5000 रुपये कर्ज घेऊन, हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडिंगचा व्यवसाय सुरू केला. या पैशातून ते कॉलेजची फी आणि इतर खर्च भागवत असे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बँकेकडून दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि प्रेशर गेज, गॅस स्टेशन आणि औद्योगिक व्हॉल्व्ह तयार करण्यास सुरुवात केली. यानंतर ते जर्मनीला गेले आणि तिथून सोलर सेल निर्मितीकडे वळले. त्यांनी त्यांच्या कंपनीचे नाव त्यांच्या गावात असलेल्या वारी मंदिरावरून ठेवले. देवाच्या आशीर्वादाने आज संपूर्ण जग त्यांच्या प्रगतीचे साक्षीदार बनले आहे.