Indian Wealth Creation: भारतीय शेअर बाजारात लक्षणीय वाढ! ५ वर्षांत तब्बल 'इतक्या' कोटींनी वाढली संपत्ती (फोटो-सोशल मीडिया)
India Wealth Creation: गेल्या पाच वर्षांत म्हणजेच २०२०-२०२५ पर्यंत भारतीय शेअर बाजारसह अर्थव्यवस्थेत देखील अभूतपूर्व वाढ झाली आहे. कोविड-१९ नंतर झालेल्या या वाढीने गेल्या ३० वर्षात संपत्ती निर्मितीचे सर्व विक्रम मोडले आहेत. MOFSL ने दिलेल्या अहवालानुसार, या ५ वर्षाच्या काळात देशातील टॉप १०० कंपन्यांचे मार्केट कॅप १४८ लाख कोटींनी वाढले असून ही वाढ भारतीय बाजारपेठेची ताकद आणि वाढत्या गुंतवणूकदारांच्या विश्वासाचे प्रतिबिंब करत आहे. यामध्ये सर्वाधिक संपत्ती निर्माण करणारे क्षेत्रांमध्ये वित्तीय क्षेत्र अर्थात बँका आणि विमा कंपन्याचा समावेश आहे. त्याचबरोबर, विक्रमी वाढीमध्ये अनेक क्षेत्रांनी सर्वाधिक योगदान दिले असून औद्योगिक, तंत्रज्ञान आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
या अहवालात सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रममध्ये विशेषतः संरक्षण आणि ऊर्जा यासारख्या धोरणात्मक क्षेत्र वेगाने वाढत असल्याचे नमूद केले आहे. तसेच, वैयक्तिक कंपन्यांमध्ये देखील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) यांनी या काळात सर्वाधिक संपत्ती निर्माण केल्याची माहिती समोर आली आहे. या कामगिरीमुळे भारत देश हा जगातील चौथा सर्वात मोठा शेअर बाजार म्हणून ओळखला जात आहे. यावर बोलताना मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे अध्यक्ष रामदेव अग्रवाल म्हणाले की, भारत आता सर्वात वेगाने संपत्ती निर्मिती अनुभवत आहे. आणि ही अभिमानाची बाब आहे.
या विकासाचा वेग बघता त्यांनी असेही भाकीत केले आहे की, पुढच्या काही वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ४ ट्रिलियन वरून १६ ट्रिलियन पर्यंत वाढत असून नवीन आणि महत्त्वपूर्ण गुंतवणूक संधी उदयास येण्याची शक्यता आहे. त्यांनी गुंतवणूकदारांना दीर्घकालीन चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा देखील सल्ला दिला.
या गतीने भारताचा GDP देखील वाढण्याची शक्यता आहे. गेल्या १७ वर्षांत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच GDP १ ट्रिलियन डॉलर्सवरून ४ ट्रिलियन डॉलर्स झाला असून येत्या १७ वर्षांत हा आकडा चौपट होण्याची देखील शक्यता आहे.
अहवालानुसार, या “मल्टी-ट्रिलियन डॉलर्स (MTD) युगात”, वित्तीय क्षेत्र आणि ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्या जसे की कार, स्मार्टफोन आणि दैनंदिन वस्तू वेगाने वाढतील. याव्यतिरिक्त, भविष्यात अनेक सातत्याने वाढणारे स्टॉक देखील दिसतील आणि मोठ्या-कॅप कंपन्या भविष्यात आणखी चांगली कामगिरी करतील.






