झोमॅटोवरून जेवण मागवणे महागले; प्लॅटफॉर्म फीमध्ये तब्बल 40 टक्क्यांहून अधिक वाढ!
ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने दिवाळीपूर्वी ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. सणासुदीच्या काळात कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्म फीमध्ये ४० टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे. त्यामुळे आता झोमॅटोवरून खाद्यपदार्थ मागवणे ग्राहकांना महागात पडणार आहे. कंपनी चालू ठेवण्यासाठी शुल्कात वाढ करण्यात आल्याचे कंपनीचे म्हटले आहे.
आता प्रति ऑर्डर 10 रुपये आकारले जाणार
झोमॅटोने प्रति ऑर्डर प्लॅटफॉर्म फी 7 रुपयांवरून 10 रुपये इतकी वाढवली आहे. प्लॅटफॉर्म फी ही जेवण ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांकडून आकारली जाते. अशा परिस्थितीत झोमॅटोकडून खाद्यपदार्थ ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. याबाबत कंपनीने म्हटले आहे की, ‘हे शुल्क झोमॅटो कंपनी चालू ठेवण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. सणासुदीच्या काळात सेवा सुरू ठेवण्यासाठी प्लॅटफॉर्म फीमध्ये किंचित वाढ करण्यात आली आहे.
🚨 Just a day after Zomato increase platform fees to Rs 10, Swiggy follows the suit 🤐 pic.twitter.com/TD2v1MmDjT
— Debarghya Sil (@debarghyawrites) October 23, 2024
वर्षभरात 400 टक्क्यांनी केलीये वाढ
झोमॅटोने एका वर्षात प्लॅटफॉर्मच्या फीमध्ये 400 टक्क्यांनी वाढ केली आहे. ऑगस्ट 2023 पासून कंपनीने प्लॅटफॉर्म फी चार्ज करण्यास सुरवात केली. त्यावेळी कंपनी केवळ 2 रुपये प्लॅटफॉर्मच्या फी घेत होती. हळूहळू कंपनीने ही फी वाढविली असून, आता ती 10 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. झोमॅटोची प्रतिस्पर्धी कंपनी स्विगीने देखील प्लॅटफॉर्म फी आकारणे सुरु केले आहे. सध्या स्विगी प्रति ऑर्डर प्रति ऑर्डर 7 रुपये चार्ज करीत आहे.
हे देखील वाचा – पेटीएमला मोठा दिलासा..! नवीन युपीआय वापरकर्ते जोडण्यासाठी एनपीसीआयकडून मान्यता!
प्लॅटफॉर्म फी म्हणजे काय?
प्लॅटफॉर्म फी प्रत्येक ऑर्डरवर जेवणाच्या शुल्काव्यतिरिक्त आकारले जाणारे अतिरिक्त शुल्क आहे. हे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), रेस्टॉरंट फी आणि वितरण शुल्कापेक्षा वेगळे आहे. बाजार तज्ञांच्या म्हणण्यानुसार, झोमॅटो दररोज 20 ते 25 लाख अन्न ऑर्डरचे वितरण करते. प्लॅटफॉर्म फी वाढविण्यामुळे कंपनीच्या खात्यात अधिकचे पैसे जमा होणार आहे.
नफ्यानंतर शेअरमध्ये उसळी
चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) वार्षिक आधारावर कंपनीने सुमारे 389 टक्के नफा कमावला आहे. हा नफा 176 कोटी रुपये इतका झाला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत झोमॅटोचा एकत्रित निव्वळ नफा 36 कोटी रुपये इतका होता. त्याच वेळी, कंपनीच्या महसुलातही 68.50 टक्के वाढ झाली आहे. कंपनीने मंगळवारी दुसर्या तिमाहीचा निकाल जाहीर केला. निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये आज वाढ झाली आहे. कंपनीचा शेअर दुपारपर्यंत दीड टक्क्यांनी वाढला आहे. या वाढीसह कंपनीचा शेअर सध्या 260 रुपयांवर व्यवहार करत आहे.