पेटीएमला मोठा दिलासा..! नवीन युपीआय वापरकर्ते जोडण्यासाठी एनपीसीआयकडून मान्यता!
ऑनलाइन पेमेंट सेवा पुरवणारी फिनटेक कंपनी पेटीएमने सप्टेंबर तिमाहीचा आपला निकाल मंगळवारी (ता.२३) जाहीर केला आहे. ज्यात कंपनी पहिल्यांदाच नफ्यात आली असून, महसुलात तब्बल 1,345 कोटींपर्यंत वाढ झाली असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता कंपनीसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआयने नवीन युपीआय वापरकर्ते जोडण्यासाठी पेटीएमला मान्यता दिली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) धक्क्यानंतर कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे.
एनपीसीआयकडून पेटीएमचा मार्ग मोकळा
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआयकडून पेटीएमला नवीन वापरकर्ते जोडण्यासाठी मान्यता मिळाल्याचे एका पत्राच्या माध्यमातून समोर आले आहे. विशेष म्हणजे कंपनीला सर्व नियम, सुचनांचे पालन केल्यानंतरच ही मंजुरी मिळाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, पेटीएमने युपीआय वापरकर्ते वाढवण्यासाठीची मागणी गेल्या ऑगस्ट महिन्यात केली होती. पेटीएम पेमेंट्स बँक पेटीएमवर आरबीआयने केलेल्या कारवाईनंतर त्यास थांबा देण्यात आला होता. त्यानंतर आता एनपीसीआयकडून पेटीएमचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.
या अटी कंपनीला मान्य कराव्या लागतील
एनपीसीआयचे मंजूरी पत्रात म्हटले आहे की, Paytm ला जोखीम व्यवस्थापन, मल्टी-बँक मार्गदर्शक तत्त्वे आणि डेटा सुरक्षा नियमांसह इतर आवश्यक अनुपालनांचे पालन करावे लागेल. याबाबत पेटीएमने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, आम्हांला हे कळविण्यात आनंद होत आहे की, एनपीसीआयने आमच्या युपीआय प्लॅटफॉर्मवर सर्व संबंधित मार्गदर्शक तत्त्वांनुसार नवीन वापरकर्ते जोडण्याची परवानगी दिली आहे.
शेअरवर काय झालाय परिणाम
सप्टेंबर तिमाहीचे उत्कृष्ट निकाल असूनही, पेटीएमच्या शेअर्समध्ये मंगळवारी घसरण झाली. तर बाजार बंद होताना, तो 5.78 टक्क्यांनी घसरून 684 रुपयांवर बंद झाला आहे. या दोन चांगल्या बातम्या एकत्र आल्याचा परिणाम आज कंपनीच्या शेअरवर दिसून आला आहे. पेटीएमचे बाजार भांडवल 43770 कोटी रुपये आहे.