मॅकडोनल्ड्स मोदींच्या मिलेट्स धोरणानुसार व्यवसाय करणार; शेतकऱ्यांना होणार आर्थिक फायदा!
बर्गर म्हटले अनेकांना तात्काळ खाण्याची इच्छा होते. मात्र, आता याच मॅकडोनल्ड्स कॉर्पोरेशन या अमेरिकन फास्ट फूड कंपनीने आपल्या धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या नवीन धोरणामुळे ग्राहकांसोबत, भारतातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. मॅकडोनल्ड्स कॉर्पोरेशनने भारतातील पश्चिम आणि दक्षिण भागात मिलेट्स अर्थात भरडधान्यांपासून बनलेला बन बर्गर तयार करण्याची योजना बनवली आहे.
फ्रँचायझीद्वारे उपलब्ध होणार नवीन उत्पादन
मॅकडोनल्ड्स कॉर्पोरेशन ही कंपनी CSIR-CFTRI या आघाडीच्या खाद्य तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या सहकार्याने आपली ही योजना राबवणार आहे. कंपनी आपले हे नवीन उत्पादन वेस्टलाइफ फूडवर्ल्ड फ्रँचायझीद्वारे उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे कंपनी शेतकऱ्यांकडून हे मिलेट्स थेट खरेदी करणार आहे. ज्यामुळे याचा भारतीय शेतकऱ्यांना देखील मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
400 मॅकडोनल्ड्स आउटलेटवर उपलब्ध असणार
मॅकडोनल्ड्स कॉर्पोरेशन ही कंपनी देशातील जवळपास ५००० शेतकऱ्यांकडून थेट बाजरीची खरेदी करणार आहे. कंपनीची ही योजना फार्म-टू-फोर्क मॉडेलवर आधारित असणार आहे. या खास बर्गरसाठी ग्राहकांना सामान्य बर्गरपेक्षा 10 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. ही नवीन ऑफर सर्व 400 मॅकडोनल्ड्स आउटलेटवर उपलब्ध असणार आहे. कंपनीच्या अन्नाची पौष्टिक गुणवत्ता सुधारणे हा यामागील उद्देश असणार आहे. जेणेकरून ग्राहकांना त्याचा दीर्घकाळ लाभ घेता येणार आहे.’ असे मॅकडोनाल्ड्स इंडियाचे कार्यकारी संचालक अक्षय जाटिया यांनी म्हटले आहे.
मोदी सरकार देतंय मिलेट्सला प्रोत्साहन
गेल्या काही काळापासून केंद्रातील मोदी सरकारने देशात मिलेट्सचा वापर वाढवण्यावर भर दिला आहे. भरडधान्याला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्रसंघासह एकत्रितपणे 2023 हे बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले. शेतकऱ्यांकडून भरड धान्य खरेदी करण्यावर या धोरणाचा भर आहे. मिलेट्सच्या उत्पादनांना प्रोत्साहन देणे, बाजरीचे पौष्टिक मूल्य आणि आरोग्यविषयक फायद्यांविषयी लोकांना जागरुक करणे यामागील मुख्य उद्देश आहे.