फोटो सौजन्य - Social Media
इ-कॉमर्सच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात “मीशो” हे नाव वेगळं ठरतं. IIT दिल्लीचे विद्यार्थी विदित आत्रेय आणि संजीव बर्नवाल यांनी सुरू केलेल्या या प्लॅटफॉर्मने लाखो भारतीयांचं ऑनलाईन व्यवसायाचं स्वप्न पूर्ण केलं आहे. विशेषतः महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचं ध्येय घेऊन मीशोने सोशल कॉमर्सचं नवं मॉडेल तयार केलं. मीशोची सुरुवात २०१५ मध्ये झाली. विदित आणि संजीव यांनी मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये असलेली असमानता ओळखली आणि सर्वसामान्य लोकांसाठी व्यवसायाची संधी निर्माण करण्याचा विचार केला. फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील, ही कल्पना घेऊन त्यांनी मीशो सुरू केलं.
मीशोचं मॉडेल एकदम वेगळं होतं. लोक इथे “रिसेलर” बनून कोणतीही गुंतवणूक न करता वस्तू विकू लागले. विशेषतः ग्रामीण भागातील महिला, गृहिणी आणि तरुणांनी याचा मोठ्या प्रमाणावर फायदा घेतला. मीशोने त्यांच्यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सोपं अॅप उपलब्ध करून दिलं. यामुळे ते स्वतःचा व्यवसाय सहज चालवू लागले.
फॅशन, लाईफस्टाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, नॉन-ब्रँडेड प्रॉडक्ट्स या क्षेत्रात मीशोने लवकरच आपला जम बसवला. २०२१ मध्ये कंपनीचा व्यवहार \$२.१ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आणि काही महिन्यांतच तो \$४.९ अब्ज झाला. फेसबुक, सॉफ्टबँक, सिकोया कॅपिटल यांसारख्या मोठ्या गुंतवणूकदारांनीही कंपनीत पैसा गुंतवला.
मीशोच्या यशामागे CTO संजीव बर्नवाल यांचा मोठा वाटा आहे. IIT दिल्लीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी जपानमध्ये Sony कंपनीत काम केलं. पण स्टार्टअप सुरू करण्याची इच्छा त्यांच्यात कायम होती. २०१५ मध्ये त्यांनी विदितसोबत भारतात परत येऊन एकत्र व्यवसायाची वाट चालायला सुरुवात केली. सुरुवातीला दोन खोल्यांच्या अपार्टमेंटमधून सुरू झालेली ही कंपनी आज अब्जावधींचं साम्राज्य आहे.
मीशोला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत. विदित आत्रेय यांना ‘फोर्ब्स ३० अंडर ३०’, ‘इकॉनॉमिक टाइम्स ४० अंडर ४०’, ‘फॉर्च्यून ४० अंडर ४०’ यासारखे पुरस्कार मिळाले आहेत. आज मीशो AI, लॉजिस्टिक ऑप्टिमायझेशन आणि विविध नव्या प्रॉडक्ट कॅटेगरीवर लक्ष केंद्रित करत आहे. पण त्यांचं मूळ ध्येय अजूनही तेच आहे – भारतातल्या प्रत्येकाला व्यवसायाची संधी देणं. मीशोची कहाणी ही केवळ यशाची नाही, तर लाखो लोकांचं आयुष्य बदलून टाकणाऱ्या परिवर्तनाची आहे.