निर्मला सीतारामन यांचा 65 वा वाढदिवस, ...कार्यकाळात घेतलेत 'हे' धडाकेबाज आर्थिक निर्णय!
अर्थमंञी निर्मला सीतारामन या आज आपला ६५ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात संरक्षणमंञी आणि अर्थमंञी अशी महत्वाची पदे भुषवली आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या कारकिर्दित अनेक महत्वाचे आर्थिक निर्णय घेतले आहेत. त्यांचा जन्म 1959 मध्ये तामिळनाडू मधील मदुराई येथील ब्राम्हण कुटुंबात झाला. याच पार्श्वभुमीवर आज आपण त्यांच्या कार्यकाळातील प्रमुख आर्थिक निर्णयांचा आढावा घेणार आहोत…
सीतारामन यांच्या कार्यकाळातील महत्वाचे आर्थिक निर्णय
१. सार्वजनिक बॅंकांचे विलिनीकरण – अर्थमंत्री निर्मला सीतारामन नेहमीच कठोर निर्णय घेण्यासाठी ओळखल्या जातात. आपल्या कार्यकाळात त्यांनी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील अनेक मोठ्या बँकांचे विलीनीकरण पूर्ण केले आहे. 2020 मध्ये त्यांनी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक यांचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय सिंडिकेट बँक, कॅनरा बँक, आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आणि अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन करण्यात आली. हे सर्व निर्णय 1 एप्रिल 2020 पासून लागू झाले.
(फोटो सौजन्य – एक्स हॅंन्डल)
हेही वाचा – अमेरिकन बर्गर किंग कंपनीला झटका, …पुण्याच्या कंपनीला मिळाले बर्गर किंगचे पेटंट!
२. 20 लाख कोटींचे आर्थिक पॅकेज – 2020 मध्ये जेव्हा देश कोरोना संकटाशी झुंजत होता. तेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाला आर्थिक मदत देण्यासाठी 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. यामध्ये 80 कोटी लोकांना मोफत रेशनचे वाटप आणि विविध प्रकारच्या आर्थिक मदतीचा समावेश होता. त्यामुळे त्यांचा कठोर निर्णय घेण्यात हातखंडा आहे.
३. ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के जीएसटी – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या कार्यकाळात ऑनलाइन गेमिंग आणि जुगारावर तब्बल २८ टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे सरकारकडून गेमिंग आणि जुगारावर विशेष देखरेख ठेवली जात आहे. अशा परिस्थितीत मुलांना अशा गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी आणि त्यावर अंकुश ठेवण्यासाठी सरकारने खेळांवर सर्वाधिक 28 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे.
४. सरकारी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका – देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत सरकारी योजना पोहोचवण्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. PMJJBY, PMSBY, PM स्वानिधी, अटल पेन्शन योजना, PM जन धन योजना, PM मुद्रा योजना यासारख्या प्रमुख योजना लोकांपर्यंत पोचवण्यावर प्रादेशिक ग्रामीण बँकांना मुख्यत्वे लक्ष केंद्रित करण्याचे आदेश अर्थमंत्र्यांनी दिले होते.
५. नवीन कर प्रणालीची घोषणा – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020 च्या अर्थसंकल्पात प्रथमच नवीन कर प्रणालीची घोषणा केली होती. जुन्या कर प्रणालीपासून यामध्ये अनेक बदल करण्यात आले होते. असे असतानाच त्यांनी जुनी करप्रणाली देखील सुरू ठेवली. अशा परिस्थितीत लोकांकडे नवीन आणि जुन्या कर प्रणालीमध्ये निवड करण्याचा पर्याय अजूनही आहे. नवीन कर प्रणालीनुसार करदात्यांना 7 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही.
६. क्रिप्टोकरन्सीवर लावला 30 टक्के कर – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्री असताना क्रिप्टोकरन्सीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी क्रिप्टो ट्रेडिंगद्वारे कमाईवर 30 टक्के कर लावण्याचा निर्णय घेतला होता. यातील धोके लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला.