आता संपुर्ण जग पिणार अमुलचे दुध; अमेरिकेनंतर युरोपीय बाजारात उतरणार ब्रॅंड!
आजपर्यंत तुम्ही अमुल दुध पिता हैं इंडिया… ही जाहिरात अनेकदा पाहिली असेल, ऐकली असेल. मात्र, आता हाच अमुल दुधाचा ब्रॅंड जगभर आपला झेंडा गाडणार आहे. चालू वर्षीच्या मार्च महिन्यापासून अमूलचे दूध अमेरिकेत उपलब्ध झाले. अमूल मिल्कने देशाबाहेर पाऊल ठेवण्याची ही पहिलीच वेळ होती. अमेरिकेतील यशस्वी पदार्पणानंतर आता युरोपमध्येही अमूलचे दूध उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता जगभर अमुलचे दुध पिले जाणार आहे.
जयेन मेहता यांची माहिती
अमूल ब्रँड गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड नावाच्या सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाखाली चालवला जातो. या असोसिएशनचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी म्हटले आहे की, अमूल दूध काही महिन्यांपूर्वी अमेरिकी बाजारात उपलब्ध झाले. त्या ठिकाणी नागरिकांना ते खूप आवडले. कंपनीचा हा प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे आता अमूल दूध युरोपियन बाजारपेठेत उतरण्यासाठी सज्ज झाले आहे.
एक्सएलआरआयने आयोजित केलेल्या 11 व्या डॉ. वर्गीस कुरियन मेमोरियल लेक्चरमध्ये मेहता यांनी ही माहिती दिली आहे. भारत आता जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला आहे. तसेच जगातील एकूण दुधापैकी एक तृतीयांश दूध येत्या काही वर्षांत देशात तयार होईल. असेही ते यावेळी म्हणाले आहे.
हे देखील वाचा – भारत आटा, तांदूळ, डाळ महागणार; ‘इतके’ वाढणार दर, सरकारच्या हालचाली सुरु!
6 महिन्यात अमेरिकेत झेंडा गाडला
अमूलने या वर्षीच्या मार्च महिन्यामध्ये अमेरिकेत प्रवेश केला होता. अमूलने अमेरिकेत दुधाचे चार प्रकार लाँन्च केले होते. यामध्ये अमूल फ्रेश, अमूल गोल्ड, अमूल शक्ती आणि अमूल स्लिम अँड ट्रिम यांचा समावेश होता. यासाठी अमूलने मिशिगन मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशनसोबत भागीदारी केली होती. ही अमेरिकेची 108 वर्षे जुनी डेअरी सहकारी संस्था आहे.
डेअरी क्षेत्राचे अर्थव्यवस्थेसाठी मोठे योगदान
दूध केवळ आरोग्य सुधारत नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेतही सुधारणा घडवून आणते. बहुतेक ग्रामीण लोकांसाठी दूध उत्पादन हे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत दुग्धव्यवसाय क्षेत्राचे योगदान ५ टक्के आहे. सुमारे 8 कोटी शेतकरी या व्यवसायाशी निगडीत आहेत. तज्ज्ञांच्या मते, पुढील 5 वर्षांत देशातील दुग्धव्यवसायात 15 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून येईल. अनेक डेअरी संबंधित स्टार्टअप्सही उत्कृष्ट काम करत आहेत.
80 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय
अमूलला त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीतून दरवर्षी प्रचंड उत्पन्न मिळते. मार्च 2024 ला संपलेल्या आर्थिक वर्षात अमुलची वार्षिक उलाढाल सुमारे 80 हजार कोटी रुपये होती. अमूलचे देशभरात 107 डेअरी प्लांट आहेत. ब्रँड 50 हून अधिक उत्पादने विकतो. दररोज 310 लाख लिटर दूध अमुल शेतकऱ्यांकडून गोळा करतो. देशभरात दरवर्षी अमूलची सुमारे २२ अब्ज पॅकेट विकली जातात. 35 लाखांहून अधिक शेतकरी या अमुलशी थेट जोडली गेली आहेत.