( फोटो सौजन्य : ai )
अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांनी खासदारांना दिलेल्या एका गोपनीय अहवालात मान्य केले आहे की, इराणकडून होणारे सर्व ड्रोन हल्ले रोखणं आता अशक्य होत चाललं आहे. जरी अमेरिकन सैन्य अनेक ड्रोन पाडत असले, तरी इराणकडून केल्या जाणाऱ्या ‘ड्रोनच्या पावसा’मुळे काही ड्रोन अमेरिकन तळांपर्यंत पोहोचत आहेत.
इराणच्या ड्रोन धोरणामागे एक हुशार खेळी आहे. इराण वापरत असलेले आत्मघाती ड्रोन ज्याला ‘शाहेद’ ड्रोन म्हटलं जातं तो बराच स्वस्त आहेत. मात्र, त्यांना हवेत पाडण्यासाठी अमेरिकेला ‘पॅट्रियट’ किंवा ‘थाड’ सारखी अत्यंत महागडी क्षेपणास्त्रे वापरावी लागतात. इराण अमेरिकाला आर्थिकदृष्ट्या जेरीस आणण्याचा प्रयत्न करत आहे. हे ड्रोन जमिनीपासून खूप खालून आणि सावकाश उडतात, त्यामुळे अमेरिकेच्या रडार यंत्रणेला त्यांना ओळखणे आणि पाडणे कठीण जाते.
आतापर्यंत अमेरिका फक्त हवेत येणारे ड्रोन पाडण्यावर भर देत होती. पण आता अमेरिकन सैन्याने आपली रणनीती बदलली आहे. आता केवळ ड्रोन पाडण्याऐवजी, जेथून हे ड्रोन लाँच केले जातात, ती ठिकाणं शोधून नष्ट करण्यावर अमेरिकेचा भर आहे. यामुळे हल्ल्यांचे प्रमाण कमी होईल, अशी अमेरिकेला आशा आहे.
या युद्धात अमेरिकेचे आर्थिक नुकसानही प्रचंड होत आहे. सुरुवातीला दररोज 2 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 16000 कोटी रुपये इतका खर्च होत होता. तो आता कमी होऊन 1 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 8000 कोटी रुपये प्रतिदिन इतका खाली आला आहे. तरीही हा आकडा खूप मोठा आहे.
अशा परिस्थितीत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, अमेरिकेकडे युद्ध लढण्यासाठी पुरेसा शस्त्रांचा साठा आहे. “आमच्याकडे शस्त्रे अफाट आहेत,” असे त्यांनी सोशल मीडियावर म्हटले असले तरी, आधुनिक शस्त्रांचा साठा अपुरा असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. व्हाईट हाऊसने मात्र स्पष्ट केले आहे की, अमेरिकेचे शस्त्रास्त्र साठे अशा अनेक ठिकाणी सुरक्षित आहेत, ज्याबद्दल जगाला काहीही कल्पना नाही.
हे युद्ध आता केवळ शस्त्रास्त्रांचे राहिले नसून ते बुद्धीचे आणि अर्थकारणाचेही बनले आहे. इराणने आपल्या ‘स्वस्त’ तंत्रज्ञानाने अमेरिकेसारख्या महासत्तेला सडेतोड उत्तर देण्याचे धोरण आखले आहे, ज्याने अमेरिकेच्या चिंतेत भर घातली आहे.






