शेअर बाजारात लवकरच येणार हा तगडा आयपीओ, गुंतवणूकदारांनो... पैसे तयार ठेवा!
भारतीय शेअर बाजार सध्या दमदार कामगिरी करत आहे. ज्यामुळे सध्या गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांना गुंतवणुकीची मोठी संधी आहे. अशातच आता देशातील वीज उत्पादन क्षेत्रातील आघाडीची सरकारी कंपनी एनटीपीसी ही आपला तब्बल 10 हजार कोटींचा तगडा आयपीओ लवकरच लॉंच करणार आहे. सरकारी वीज उत्पादन कंपनी असलेली एनटीपीसी ही आपल्या एका उपकंपनीला या आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारात सूचीबद्ध करणार आहे. दरम्यान, या आयपीओची तारीख निश्चित झाली नसली तरी, याबाबतची तारीख लवकरच समोर येणार असल्याचे सांगितले जात आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उघडणार
देशातील आघाडीची बिझनेस वृत्तवाहिनीने आपल्या वृत्तांत म्हटले आहे की, एनटीपीसीची उपकंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा आयपीओ नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उघडणार आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने अहवालात हा दावा करण्यात आला आहे. मात्र, एनटीपीसी किंवा एनटीपीसी ग्रीन एनर्जीकडून आयपीओच्या तारखेबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
(फोटो सौजन्य – istock)
एनटीपीसीची उपकंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या या प्रस्तावित आयपीओच्या माध्यमातून एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड बाजारातून 10 हजार कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजेच हा आयपीओ 10 हजार कोटी रुपयांचा असणार आहे. अशाप्रकारे, एनटीपीसीच्या या IPO चे नाव भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आयपीओंच्या यादीत समाविष्ट होणार आहे.
सर्वात मोठ्या आयपीओचा विक्रम एलआयसीच्या नावे
सध्या भारतातील सर्वात मोठ्या आयपीओचा विक्रम एलआयसीच्या नावावर आहे. सरकारी विमा कंपनी एलआयसीने मे 2022 मध्ये 21,008 कोटी रुपयांचा आयपीओ आणला होता. आतापर्यंतच्या इतिहासात असे फक्त 7 आयपीओ आहेत, ज्यांचा आकार हा 10 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
भारतीय शेअर बाजारातील आतापर्यंतचे सर्वात मोठे आयपीओ
– एलआयसी : 21,008 कोटी रुपये (मे 2022)
– पेटीएम : 18,300 कोटी रुपये (नोव्हेंबर 2021)
– कोल इंडिया : 15,199 कोटी रुपये (नोव्हेंबर 2010)
– रिलायन्स पॉवर : 11,563 कोटी रुपये (फेब्रुवारी 2008)
– जीआयसी : 11,175 कोटी रुपये (ऑक्टोबर 2017)
– ओएनजीसी : 10,694 कोटी रुपये (जुलै 1995)
– एसबीआय कार्ड : 10,355 कोटी रुपये (मार्च 2020)
एनटीपीसीच्या प्रस्तावित आयपीओपूर्वी देशातील विविध शहरांमध्ये रोड शो केला जाणार आहे. भारताबाहेर ब्रिटन, अमेरिका आणि सिंगापूर इत्यादी ठिकाणी रोड शो आयोजित करण्याची कंपनीची योजना आहे. जेणेकरून अधिकाधिक गुंतवणूकदारांना आयपीओकडे आकर्षित करण्यास मदत होईल. एनटीपीसी ग्रीन आयपीओसाठीचा मसुदा या महिन्यात 18 सप्टेंबर रोजी सेबीकडे दाखल करण्यात आला होता. या आयपीओमध्ये संपुर्ण नवीन शेअर्स असणार आहेत.