Digital Life Certificate can be submitted for free from home (फोटो - सोशल मीडिया)
Digital Life Certificate : पोस्ट ऑफिस आणि ईपीएफओ सर्व पेन्शनधारकांसाठी खुशखबर घेऊन आले आहे. आता पेन्शनधारक त्यांच्या घरात बसून आरामात जीवन प्रमाणपत्र मोफत सादर करू शकतात. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि ईपीएफओ यांच्यात भागीदारी झाल्याने पेन्शनधारकांना बँक किंवा ईपीएफओ कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही. त्यांना घरीच जीवन प्रमाणपत्र काढता येईल.
डिजिटल जीवन प्रमाणपत्र : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक म्हणजेच (आयपीपीबी) ने आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी (ईपीएफओ) भागीदारी केली असून ईपीएफओ पेन्शनधारकांना आता त्यांच्या घरात बसून आरामात डिजिटल जीवन प्रमाणपत्रे जमा करता येतील. यामुळे पेन्शनधारकांना घरापासून दूर किंवा प्रवास करण्याची शक्यता भासणार नाही. तसेच, डिजिटल जीवन प्रमाणपत्र पूर्णपणे मोफत सेवा असून त्याचा सर्व खर्च ईपीएफओ उचणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
आयपीपीबी आणि ईपीएफओ कराराअंतर्गत, आयपीपीबी त्यांचे १,६५,००० पोस्ट ऑफिस आणि ३,००,००० हून अधिक बँकिंग कर्मचारी पेन्शनधारकांच्या घरांपर्यंत पोहोचणार आहेत. बायोमेट्रिक पद्धतीने पेन्शनधारकांना चेहरा किंवा फिंगरप्रिंट वापरून घरबसल्या आरामात जीवन प्रमाणपत्र जमा करता येईल. यामुळे इतर कागदी प्रमाणपत्रांची गरज भासणार नाही.
पेन्शनधारकांना ही सेवा कशी मिळेल?
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत ईपीएफओच्या ७३ व्या स्थापना दिनी आयपीपीबी आणि ईपीएफओ यांच्यामध्ये करार होऊन त्यावर स्वाक्षरी करण्यात आली. आयपीपीबीचे एमडी व सीईओ आर. विश्वेश्वरन आणि ईपीएफओचे केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त रमेश कृष्णमूर्ती यांनी कागदपत्र सादर केली. सचिव वंदना गुरनानी, सीबीटी सदस्य आणि दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर या स्थानपा दिनी कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी हजेरी लावली होती. आयपीपीबीचे सीईओ यांनी ही भागीदारी सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने पाऊल असल्याचे सांगितले. तसेच, इझी लिव्हिंग उपक्रमांशी सुसंगत असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामीण आणि शहरी भागातील पेन्शनधारकांना या भागीदारीचा सर्वाधिक फायदा होईल याचे आश्वासन त्यांनी दिले. आयपीपीबीचे तांत्रिक पोस्टल नेटवर्क संपूर्ण देशात पसरलेले असल्याची अभिमानाची बाब सांगितली.
पोस्ट विभागाच्या अंतर्गत आयपीपीबी ही १००% सरकारी बँक असून ही भागीदारी १९९५ च्या कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शनधारकांसाठी असल्याची माहिती दिली. जीवन प्रमाणपत्र दरवर्षी नोव्हेंबरमध्ये आवश्यक असते. जर जीवन प्रमाणपत्र नसेल तर त्यांचे पेन्शन बंद केले जाते. त्यामुळे या करारामुळे पेन्शनधारकांना हे काम घरबसल्या करता येईल. ही सेवा सुरू झाल्यानंतर, आयपीपीबी ॲप वापरून पेन्शनधारक हे प्रमाणपत्र काढू शकतात. किंवा घरोघरी काम करणारे बँक कर्मचारी मोबाईल डिव्हाइसवर आधार लिंक करून प्रमाणपत्र थेट EPFO ला पाठवतील. त्यामुळे त्यांच्या पेन्शनमध्ये खंड पडणार नाही.
हेही वाचा : Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीचे दर गगनाला भिडले, आजचे भाव वाचून तुम्ही चक्रवाल
या सेवेचा लाभ कोणाला मिळू शकतो ?
डिजिटल लाइफ सर्टिफिकेट अर्थात जीवन प्रमाण पत्र ही बायोमेट्रिक डिजिटल सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, EPFO किंवा इतर कोणत्याही सरकारी विभागाचे कर्मचारी अर्थात पेन्शनधारक याचा लाभ घेऊ शकतात. मात्र, यासाठी अट एकच आहे, की पेन्शन वितरण संस्था DLC सेवा देईल. पेन्शनधारकांना आता बँक किंवा कार्यालयात कागदी प्रमाणपत्र घेऊन जावे लागणार नाही. बायोमेट्रिक पद्धतीने आधारशी लिंक केलेला चेहरा किंवा फिंगरप्रिंट द्वारे प्रमाणपत्र घरी तयार केले जाऊ शकते. सरकारचे असे म्हणणे आहे की, वृद्धांच्या सोईसाठी हे पाऊल महत्वाचे आहे. बँकिंगसोबतच पोस्ट ऑफिस आता पेन्शन सेवा देखील देतील, ज्यामुळे लाखो पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे.






