मिश्र शेतीतून शेतकऱ्याने साधली प्रगती; मिळवतोय वार्षिक 15 लाखांचे उत्पन्न!
सध्याच्या घडीला शेतकऱ्यांकडे जमिनीचे प्रमाण कमी-कमी होत चालले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यासाठी अधिक पिकांची लागवड करणे क्रमप्राप्त ठरत आहे. परिणामी, सध्या अनेक शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करताना दिसून येत आहे. अशातच आता एका शेतकऱ्याने मिश्र शेतीच्या माध्यमातून मोठी कमाई केली आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याच्या यशस्वी मिश्र शेतीची यशोगाथा पाहणार आहोत.
मिश्र शेतीची धरली वाट
श्याम सिंह असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते मध्यप्रदेशातील भोपाळ जवळील गोलखेडी येथील रहिवाशी आहेत. श्याम यांची ९ एकर जमीन असून, त्यात त्यांनी ४ एकरात अन्नधान्य उत्पादन, दोन एकरात फळपिकांची लागवड तर उर्वरित जमिनीमध्ये सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड केली आहे. तर शेतीला त्यांनी पशुपालनाचीही जोड दिली आहे. विशेष म्हणजे या सर्व जमिनीवरील मिश्र पद्धतीच्या पिकांच्या माध्यमातून ते वर्षाला तब्बल १५ लाखांहून अधिकची कमाई मिळत आहे. ज्यामुळे सध्या त्यांची पंचक्रोशीत सर्वदूर चर्चा होत आहे.
(फोटो सौजन्य : istock)
पॉलीहाऊसमध्ये भाजीपाला उत्पादन
शेतकरी श्याम सिंह सांगतात, आपण राज्य सरकारच्या अनुदान योजनेच्या माध्यमातून पॉलीहाऊस उभारले आहे. ज्यामुळे शेतीमध्ये भाजीपाला उत्पादन घेण्यास मोठी मदत झाली आहे. सध्या आपण दोन एकरात पॉलीहाऊसमध्ये पालेभाज्यांची लागवड केली असून, त्यातून आपल्याला 100 ते 125 क्विंटल भाजीपाला उत्पादन मिळत आहे. विशेष म्हणजे आपण सर्व भाजीपाला हा सेंद्रिय पद्धतीने पिकवत असून, त्यास शहरी भागात मोठी मागणी आहे. परिणामी, त्यास दर देखील अधिकचा मिळत आहे.
मिश्र शेती म्हणजे काय?
मिश्र शेती म्हणजे शेतीची अशी पद्धत असते. ज्यामध्ये एकत्रित सर्व पिके घेण्याव्यतिरिक्त पशुपालनाचाही समावेश होतो. संपूर्ण आशिया व्यतिरिक्त, भारत, मलेशिया, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, चीन, मध्य युरोप, नॉर्डिक देश, कॅनडा आणि रशिया या देशांमध्ये या प्रकारची मिश्र शेती खूप लोकप्रिय आहे.
पशुपालनातूनही महिन्याला २६ हजारांची कमाई
शेतकरी श्याम सिंह सांगतात, शेतीसोबत ते पशुपालन व्यवसाय देखील करतात. ज्यातून त्यांना दररोज 60 ते 70 लीटर दूध उत्पादन मिळत आहे. अर्थात त्यांना केवळ पशुपालन व्यवसायातून महिन्याला 26 हजार रुपये इतकी कमाई होते. याव्यतिरिक्त श्याम सिंह यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी पशुपालन व्यवसायातून फायदा देखील होत आहे. यात प्रामुख्याने गाईचे शेण जीवामृत आणि अन्य जैविक खादनिर्मितीसाठी उपयोगी ठरत आहे.