कांदा प्रश्नावरून राजू शेट्टींचे पंतप्रधान मोदींना पत्र; बांग्लादेशबाबत केली 'ही' महत्वाची मागणी!
बांगलादेशच्या राजकीय अस्थिरतेचा राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक मोठा फटका बसणार आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून दररोज कांद्याचे 70 ते 80 ट्रक बांगलादेशला रवाना होतात. मात्र, आता गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातून बांगलादेशला पाठवले जाणारे हे कांद्याचे शेकडो ट्रक भारत-बांगलादेश सीमेवर थांबले आहेत. दरम्यान, मंगळवारी (ता.६) “कांदा, मका उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली, बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे भाव कोसळणार” या शीर्षकाखाली ‘डिजिटल नवराष्ट्र’ने मंगळवारी (ता.६) वृत्त प्रसारित केले होते. त्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कांदा प्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.
काय म्हटलंय राजू शेट्टी यांनी आपल्या पत्रात?
बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे भारताची दळणवळण व्यवस्था ठप्प झाली आहे. दळणवळण होत नसल्याने कांद्याची वाहतूक होत नसल्याचे राजू शेट्टींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. बांगलादेशच्या परिस्थितीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारशी बोलणी करुन, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.
हेही वाचा : बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेचा गंभीर परिणाम; भारतीय फळे-भाजीपाल्याची निर्यात थांबली!
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका
बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळे भारताने आपल्या सीमा सील केल्या आहेत. बांगलादेशमध्ये भारतातून होत असलेली शेतमालाची निर्यात पूर्णपणे थांबली आहे. बांगलादेश भारताकडून जवळपास 75 टक्के शेतमाल आयात करत असल्याने, या घडामोडींमुळे देशातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. नाशिकमधून दररोज कांद्याचे 70 ते 80 ट्रक बांगलादेशला रवाना होतात. नाशिकहून बांगलादेशला जाणारे कांद्याचे शेकडो ट्रक भारत-बांगलादेश सीमेवर थांबले आहेत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.