कर्ज महागणार की स्वस्त होणार? आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या होणार मोठा निर्णय!
तुम्ही कर्जदार आहात किंवा कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी लवकरच दिलासादायक बातमी समोर येऊ शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (आरबीआय) मॉनेटरी पॉलिसी कमिटीची बैठक 7-9 ऑक्टोबरला होणार आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत रेपो रेटबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता लवकरच सर्वसामान्यांना कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नवव्यांदा रेपो रेट जैसे थे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (आरबीआय) मॉनेटरी पॉलिसी कमिटीची बैठक गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये झाली होती. त्यात कमिटीने सलग नवव्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नव्हता. म्हणजेच रेपो रेट जैसे थे ठेवले होती. आरबीआयच्या निर्णयाचा देशातील कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला होता. आता ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या बैठकीत देखील रेपो रेटमध्ये कपातीची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे आता कमिटी याबाबत नेमका कोणता निर्णय घेते. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
(फोटो सौजन्य – istock)
काय आहे सध्याचा रेट
आरबीआयची मॉनेटरी पॉलिसी कमिटीची बैठक प्रत्येक दोन महिन्यानंतर होत असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोरोना काळात (27 मार्च 2020 ते 9 ऑक्टोबर 200) दोन वेळा रेपो रेटमध्ये 0.40 टक्क्याने कपात केली होती. त्यानंतर झालेल्या पुढील 10 बैठकीत तब्बल 5 वेळा रेपोरेटमध्ये वाढ केली होती. कोविडपूर्वी 6 फेब्रुवारी 2020 रोजी रेपो रेट 5.15 टक्के होता. RBI ने शेवटचे फेब्रवारी 2023 मध्ये रेपो रेटमध्ये 0.25 टक्काने वाढ केली होती. सध्याचा रेपो रेट 6.5 टक्के आहे.
रेपो रेटमध्ये होऊ शकते कपात
दरम्यान, भारतामध्ये मार्च 2025 पर्यंत रेपो रेटमध्ये 0.50 टक्के कपात होऊ शकते. असा अंदाज फायनान्शियल सर्व्हिसेसचे चिफ इन्वेस्टमेंट स्ट्रॅटजिस्ट डॉ. व्ही. के. विजयकुमार यांनी वर्तवला आहे. ज्यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. आरबीआयने 8 फेब्रुवारी 2023 नंतर व्याजरात कोणाताही बदल केलेला नाही. सध्याचा रेपो रेट 6.50 टक्के आहे. दरम्यान, पॉलिसी रेट जास्त असेल, तर बँकांना केंद्रीय बँककडून मिळणारे कर्ज महागड्या दरात मिळते. त्यानंतर बँका देखील आपल्या ग्राहकांसाठी कर्ज महाग करतात. त्यामुळे आता देशभरातील कर्जदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.