देशातील जीएसटी संकलनात 6.5 टक्क्यांनी वाढ, सप्टेंबरमध्ये झालीये 1.73 लाख कोटींची वसुली!
सप्टेंबर महिना संपला असून, आज ऑक्टोबर महिना सुरु झाला आहे. अशातच आता मागील सप्टेंबर महिन्यातील जीएसटी संकलनाची आकडेवारी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2024 या महिन्यामध्ये वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) संकलन 1.73 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. जे मागील वर्षीच्या याच कालावधीतील 1.63 लाख कोटी रुपयांपेक्षा 6.5 टक्के अधिक आहे. दरम्यान, ऑगस्ट 2024 या महिन्यामध्ये जीएसटी संकलन हे 1.74 लाख कोटी रुपये इतके राहिले होते. जीएसटी रिफंड जारी केल्यानंतर, सप्टेंबर महिन्यात एकूण संकलन 4 टक्क्यांनी वाढून, 1.53 लाख कोटी रुपये झाले आहे.
पहिल्या सहामाहीत 10.72 लाख कोटींचा जीएसटी संकलित
2024-25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात, एप्रिलमध्ये 2.10 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. जे आतापर्यंतचे उच्चांकी संकलन राहिले आहे. मात्र, त्यानंतर संकलनात घट झाली आहे. मे 2024 मध्ये 1.73 लाख कोटी रुपये, जूनमध्ये 1.6 लाख कोटी रुपये, जुलै 2024 मध्ये 1.82 लाख कोटी रुपये आणि ऑगस्टमध्ये 1.74 लाख कोटी रुपये संकलन होते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एकूण जीएसटी संकलन 10.72 लाख कोटी रुपये इतके झाले आहे.
(फोटो सौजन्य – istock)
1,27,850 कोटींचा महसुल जमा
जीएसटी संकलनाच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात एकूण सीजीएसटी संकलन 31,422 कोटी रुपये, एसजीएसटी संकलन 39,283 कोटी रुपये, आयजीएसटी संकलन 46,087 कोटी रुपये आणि उपकर संकलन 11,059 कोटी रुपये होते. म्हणजेच सकल देशांतर्गत महसूल 1,27,850 कोटी रुपये आहे जो मागील वर्षी याच कालावधीत 1,20,686 कोटी रुपये होता. तर एकूण आयात महसूल 45,390 कोटी रुपये आहे. सप्टेंबर महिन्यात एकूण 20,458 कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला आहे. जो मागील वर्षी 15,614 कोटी रुपये इतका होता.
अशी आहे राज्यनिहाय जीएसटी महसुलातील वाढ
राज्यांच्या जीएसटी महसुलावर नजर टाकली तर हरियाणाच्या महसुलात २४ टक्के, दिल्लीच्या महसुलात २० टक्के आणि महाराष्ट्राच्या महसुलात ५ टक्के वाढ झाली आहे. तमिळनाडूच्या महसुलातही ५ टक्के आणि कर्नाटकच्या महसुलात ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशच्या महसुलात ३ टक्के वाढ झाली आहे. तर सिंथारमध्ये हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या जीएसटी महसुलात 33 टक्के घट झाली आहे.