SBI च्या ग्राहकाना झटका..! क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल, 1 नोव्हेंबरपासून होणार लागू!
तुम्ही वीज, गॅस किंवा पाणी यांसारखी युटिलिटी बिले भरण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) यूटिलिटी बिलांबाबत आपल्या क्रेडिट कार्डच्या नियमात मोठा बदल केला आहे. एसबीआय क्रेडिट कार्डने केलेल्या युटिलिटी बिल पेमेंटवर आता ग्राहकांकडून अतिरिक्त 1 टक्के शुल्क आकारले जाणार आहे. हा बदल 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणार आहे.
1 नोव्हेंबरपासून होणार लागू
एसबीआयच्या या बदलामुळे आता एसबीआय क्रेडिट कार्ड धारकांना वीज, गॅस, पाणी आणि इतर यूटिलिटी बिले भरण्यासाठी अतिरिक्त रक्कम मोजावी लागणार आहे. इतर अनेक बँकां आणि कार्ड कंपन्यांनी याआधीच एका निश्चित मर्यादेनंतर युटिलिटी बिल पेमेंटवर 1 टक्के शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता एसबीआयच्या ग्राहकांना देखील 1 नोव्हेंबर पासून हे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.
हे देखील वाचा – वडापाव विकून महिन्याला कमावतोय 2 लाख रुपये, …दिवसभर लागते ग्राहकांची रांग!
एसबीआयने ग्राहकांना पाठवले ई-मेल
स्टेट बँक ऑफ इंडियाने अलीकडेच ग्राहकांना या शुल्क वाढीच्या बदलांची माहिती देणारे ई-मेल पाठवले आहेत. “एसबीआय कार्डमध्ये आम्ही विश्वास आणि पारदर्शकतेवर आधारित संबंध निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. या प्रयत्नात तुमच्या क्रेडिट कार्डासंबंधीच्या महत्त्वाच्या अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती देण्यासाठी आम्ही हा संवाद पाठवत आहोत,” असे बँकेने म्हटले आहे. एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे एका स्टेटमेंट सायकलमध्ये 50 हजार रुपयांपेक्षा जास्त युटिलिटी बिल पेमेंटवर बँक अधिभार लावेल, असेही बँकेने म्हटले आहे.
50,000 रुपयांपेक्षा जास्त बिलांवर अधिभार
एसबीाय क्रेडिट कार्ड ग्राहकांनी 1 नोव्हेंबर 2024 पासून एकाच स्टेटमेंट सायकलमध्ये 50,000 रुपयांपेक्षा जास्त युटिलिटी बिल पेमेंट केल्यास त्यावर 1 टक्के अतिरिक्त शुल्क लागू केला जाईल. परंतु एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे तुमची युटिलिटी बिल पेमेंट त्याच सायकलमध्ये 50,000 रुपयांपेक्षा कमी असेल, तर अशा स्थितीत कोणतेही अतिरिक्त शुल्क लागू होणार नाही, असे देखील बँकेने स्पष्ट केले आहे.
एसबीआयने शौर्य/डिफेन्स क्रेडिट कार्ड वगळता सर्व अनसिक्योर्ड क्रेडिट कार्डचे वित्त शुल्क देखील बदलले आहे. आता एसबीआयच्या अनसिक्योर्ड क्रेडिट कार्डवर 3.75 टक्के वित्त शुल्क आकारले जाईल. हे नियम 1 नोव्हेंबर 2024 पासून देखील लागू होतील. अशी माहितीही बॅंकेने आपल्या वेबसाईटवर दिली आहे.